प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपणं एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. घराचा दरवाजा उघडा पाहून घरात चोर शिरला. पण चोरीचा डाव फसल्याने संतापले्या चोरट्याने घरमालक आणि त्याच्या पत्नीवर चाकूने वार केले. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातल्या कोष्टी गावात घडली.
या घटनेत घरमालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर भंडारा इथल्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकी घटना काय?
कोष्टी गावात मुरलीधर नत्थू किरनापुरे पत्नी सिंधु किरणापुरे आणि दोन मुलांसहा राहतात. दैनंदिन काम करुन किरणापुरे पती-पत्नी रात्रीच्या सुमारास झोपी गेलं होतं. त्यांची दोन मुलं क्रिकेट पाहण्यासाठी गेली होती. ती रात्री उशीरा परत येणार असल्याने किरणापुरे यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता.
याच संधीचा फायदा उचलत त्याच गावात राहणारा संजय नगरधने हा किरणापुरे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरला. आरोपीच्या हालचालीमुळे मुरलीधर किरणापुरे आणि त्यांच्या पत्नीला जाग आली. आपला चोरीचा डाव फसला आणि आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपी संजयने आपल्याजवळील चाकूने मुरलीधर किरणापुरे यांच्या पत्नीवर हल्ला केला. दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने आरोपीने तिथून पळ काढला.
किरणापुरे यांच्या आरडाओरडीने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी तात्काळ किरणापुरे पती-पत्नीला उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णलयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान मुरलीधर किरणापुरे यांचा जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सिंधु किरणापुरे हिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरु केला आहे. तुमसर पोलिसांनी हत्येचा आणि चोरीचा गुन्हा नोंद केला असून फरार असलेल्या आरोपी नगरधनेचा तुमसर पोलीस शोध घेत आहेत.