मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीबाबत मोठा निर्णय

Mumbai Goa Highway : कोकणात तसेच गोव्यात जाणाऱ्यांना प्रवाशांना आता पंधरा दिवस थोडीशी कसरत करावी लागणार आहे. परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविण्यात येणार आहे. 

Updated: Apr 21, 2023, 12:05 PM IST
मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीबाबत मोठा निर्णय title=
संग्रहित छाया

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महमार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. या मार्गाच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. चिपळूण जवळील परशुराम घाटात काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनी माहिती घेऊन प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात तसेच गोव्यात जाणाऱ्यांना प्रवाशांना आता पंधरा दिवस थोडीशी कसरत करावी लागणार आहे. परशुराम घाटातील वाहतूक 25 एप्रिल 2023 ते 10 मे या कालावधीत दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहतूक चिरणी आंबडस मार्गे वळविण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी जारी केला आहे.

 परशुराम घाट बंद, या मार्गे वाहतूक वळणार

परशुराम घाट बंद राहणार असल्याने बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी - आंबडस - चिपळूण मार्गे वळविण्यात आली आहे. याबाबत काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. अवजड वाहनांना बंदी असणार आहे. पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून या घाटात युद्धपातळीवरती काम हाती घेण्यात आले आहे. परशुराम घाटात धोकादायक ठिकाणी काम सुरु आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी या राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथॉरिटीकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

परशुराम घाटाच्या चौथ्या टप्प्याचे काम सुरु 

परशुराम घाटात 1.20 किमी लांबाचा आहे. डोंगर आणि दऱ्या असल्याकारणाने चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी हा भाग अवघड स्वरुपाचा आहे. 100 मीटर लांबीतील काम हे अवघड आहे. या मार्गात सुमारे 25 मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने येथे भागामध्ये चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत आहे. त्यापैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरीत चौथ्या टप्प्याचे काम सुरु आहे. त्यामुळे घाटात दगड आणि माती खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही धोका उद्तभवू नये म्हणून घाटातून सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्यासाठी आणि संभाव्य जिवित तसेच वित्त हानी टाळण्यासाठी परशुराम घाट वाहतुकीसाठी काही कालावधीत बंद ठेवावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाकडून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला करण्यात आली होती. याचा विचार करुन रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी आले होते. त्यानंतर परशुराम घाटातील वाहतूक 25 एप्रिल 2023 ते 10 मे या कालावधीत दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.