NEET परीक्षा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी फायद्याची की तोट्याची? राज्य सरकार आढावा घेणार

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सरकार विचार करणार का? NEET परीक्षा रद्द होणार का?

Updated: Sep 22, 2021, 07:38 PM IST
NEET परीक्षा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी फायद्याची की तोट्याची? राज्य सरकार आढावा घेणार title=

मुंबई: विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आणि काहीशी दिलासा देणारी बातमी येत आहे. राज्य सरकार NEET परीक्षेबाबत आढावा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. तामिळनाडू सरकारने NEET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धरतीवर आता पुन्हा एकदा NEET परीक्षा घ्यावी की नको आणि ती न घेणं राज्यातील विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं ठरेल का याचा पुनर्विचार करणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नीट परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोनामुऴे दहावी आणि बारावीच्या यंदा परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मूल्यमापनावर आधारीत त्यांना मार्क देण्यात आले. आता बारावीच्या मार्कांवर मेडिकलसाठी अॅडमिशन मिळावी यासाठी पुन्हा एकदा चर्चा जोर लावून धरली जात आहे. 

MBBS प्रवेशासाठी देशपातळीवर NEET ही एकच सामाईक परीक्षा घेतली जाते. राज्य सरकार नीट परीक्षेबाबत पुन्हा आढावा घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकार NEET परीक्षेबाबत आढावा घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या निर्णयाकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. 

NEET UGC परीक्षेच्या 19 तासांपूर्वी तामिळनाडूमध्ये एका विद्यार्थ्याने परिक्षा होण्यापूर्वी आत्महत्या केली होती.  परीक्षेनंतर एका विद्यार्थिनीनेही आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. हे आत्महत्येचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून आले. तामिळनाडू राज्यात नीट परीक्षा नको, अशी भूमिका असणारं विधेयक तमिळनाडू विधिमंडळात मांडण्यात आलं. 

या विधेयकाला तामिळनाडूतील भाजप वगळता इतर राजकीय पक्षांना पाठिंबा देत विधेयक मंजूर केलं. तामिळनाडूमध्ये आता 12 वीच्या गुणांवर मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश मिळेल असं त्यामध्ये म्हटलं होतं.