मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यावर सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राज्यात युती आघाडीत अनेक ठिकाणी बंडाळी झाली आहे. या नाराजांची समजूत घालून त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
'बंडोबांना थंडोबा' करण्याची मोहीम सर्वच पक्षात युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यातील २७ मतदारसंघांत भाजपच्या ११४ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वाधिक ९ बंडखोर कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगड मतदारसंघात शिवसेना उमेदवाराविरोधात उभे आहेत.
पक्षातील बंडखोरी मोडून काढण्यासाठी भाजपाने चंग बांधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सध्या मुंबईचे तळ ठोकून आहेत, बंडखोरी करणाऱ्या किंवा संबंधितांना संपर्क करण्याचे मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे.
समजून घालत, आश्वासनं देत किंवा मग पक्ष कारवाईचा धाक दाखवत बंडखोरांना शांत करण्याचे काम सुरू आहे. तेव्हा आता सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना याच कितपत यश मिळतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे बंडखोरांना ताब्यात ठेवण्यासाठी म्हणून आता या पक्षांकडून कोणती युक्ती लढवली जाणार हेसुद्धा तितकंच लक्ष देण्याजोगं ठरणार आहे.