Devendra Fadnavis Slams Sharad Pawar: भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट का पडली आणि आमदार पक्ष सोडून का गेले हे शरद पवारांना ठाऊक आहे असं फडणवीस म्हणाले आहेत. मुंबईमध्ये तैवानमधील कंपन्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी केलेल्या विधानावर भाष्य केलं.
पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारताना, "अजित पवार काही यंत्रणांना घाबरुन भाजपाबरोबर केले. काही नेते सुद्धा मला असं म्हटले होते की कुठेतरी तुरुंगात जाण्याची भीती आम्हाला होती म्हणून आम्ही सरकारसोबत आहोत असं म्हणाल्याचा गौप्यस्फोट केला आहे," असं म्हणत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर फडणवीस यांनी, "माझं एवढेच म्हणणं आहे की 2019 ला सन्माननिय शरद पवारांनी आमच्याशी चर्चा केली होती. ते आमच्यासोबत याययला तयार होते. ते कोणत्या एजन्सींना घाबरुन आमच्यासोबत येण्यास तयार होते का? 2017 लाही त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती, हे मी यापूर्वीही सांगितलं होतं. तेव्हा ते कुठल्या एजन्सींना घाबरुन येत होते का?" असा प्रतिप्रश्न विचारला.
पुढे बोलताना फडणवीस यांनी, "पवारासाहेबांना नीट माहिती आहे की त्यांच्या पक्षातले लोक बाहेर का पडले. खरं म्हणजे अजितदादांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की, पवारसाहेबांच्या मान्यतेनी जेव्हा आमचं सरकार बदललं तेव्हा राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या करुन भाजपासोबत जायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे सगळे लोक गेल्यानंतर त्यांच्यावर आरोप करणं फार चुकीचं आहे," असं म्हटलं आहे.
शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या विधानावरुनही प्रसारमाध्यमांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला. "धर्मरावबाबा आत्राम यांनी असा दावा केला आहे की अजित पवार मुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस यांचं त्याला पाठबळ आहे," असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर फडणवीस यांनी, "असं आहे की जो जो राजकारणात आहे त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे कधी ना कधी संधी मिळणार आहे. अजित पवार त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. पण त्यासोबत या सर्वांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना एकत्रितपणे आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यामुळे कालही मी अतिशय क्लिअर बोललो. काही लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे," असं उत्तर दिलं.