किरीट सोमय्या रायगडच्या कोर्लई गावात दाखल, 19 बंगल्याचं रहस्य उलगडणार?

अलिबागच्या कोर्लई गावात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले आहेत असा दावा सोमय्या यांनी केला आहे  

Updated: Feb 18, 2022, 01:36 PM IST
किरीट सोमय्या रायगडच्या कोर्लई गावात दाखल, 19 बंगल्याचं रहस्य उलगडणार? title=

अलिबाग : अलिबागच्या कोर्लई गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. यासंदर्भातले रश्मी ठाकरे यांनी कर भरल्याची कागदपत्रही सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दाखवली होती. आता ज्या कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांचे बंगले असल्याचा दावा सोमय्या यांनी केलेला. त्या गावात किरीट सोमय्या दाखल झाले आहे. 

अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावावर जमिन खरेदी करण्यात आली होती. त्या जमिनीवर घरं आहेत की चोरीला गेली आहेत ही वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहेत. त्यासाठी कोर्लईला आल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या अलिबागमध्ये दाखल झाल्यानंतर अलिबागच्या पेजरीगावात भाजप कार्यकर्त्यांकडमून सोमय्या यांचं फटाके फोडून स्वागत करण्यात आलं.

शिवसेनेचा सोमय्यांना इशारा
दरम्यान, अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असला तर त्याला जशास तसं उत्तर देऊ असं आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलंआहे. तर शिवसेनेचा दणका दाखवू, असा इशारा आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी उडवली खिल्ली
कोर्लईतील बंगले प्रकरणानंतर  किरीट सोमय्या vs शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. आज कोर्लईत सोमय्या पोहोचल्याने संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कोण हा किरीट सोमय्या ? छोड दो पागल आदमी है... यहावंहा  घुमता है ...वो जेल जानेका रास्ता ढुंड रहा है. जल्दही जनता उसकी धिंड निकालेगी, असे राऊत म्हणाले. 

बंगले कुठे आहेत ते दाखवा. ते बंगले स्वप्नात येत आहेत. यावर वारंवार स्पष्टीकरण झाले आहे. त्या जमीनीवर एकही बंगला नाही. हा भुताटकीच्या प्रकार आहे. भाजप पक्षाच्या नेत्यांना भुताटकी झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या बेनामी प्राॅपर्टी आहेत म्हणून ते बोंबलत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.