'सत्तेची मस्ती काही जणांना दाखवायची आहे, मी यांचे सर्व पराक्रम जनतेसमोर आणणार' नारायण राणे यांचा इशारा

थोडं थोडं काढुयात, एकदम ब्रेकिंग न्यूज नको, आपण बोललो तर परवडणार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे

Updated: Aug 27, 2021, 04:13 PM IST
'सत्तेची मस्ती काही जणांना दाखवायची आहे, मी यांचे सर्व पराक्रम जनतेसमोर आणणार' नारायण राणे यांचा इशारा title=

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांची जनआशीर्वाद यात्रा (janashirwad yatra) आजपासून पुन्हा रत्नागिरी (Ratnagiri) शहरातून सुरू झाली. यावेळी बोलताना राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. पिंजऱ्यात बसून कोणी सत्ता चालवत नाही, असा टोला त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता लगावला आहे. 

काहीजण सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपण बोललो तर परवडणार नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिला आहे.  राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप करत आपली अटकही कायदेशीर नसल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 

राणे घाबरले असं काही जणांना वाटलं, पण घाबरणं रक्तातच नाही, मी घाबरत नाही, असं नारायण राणे यांनी ठणकावलं. संजय राऊत (sanjay raut) आणि विनायक राऊत (vinayak raut) हे वायफळ बडबड करतात, दोन राऊत शिवसेनेला डुबवणार, असा टोला यावेळी नारायण राणे यांनी लगावला आहे.  पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. अन्यथा पुढे कारवाईचा सामना करावा लागेल, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार येऊन जवळपास 2 वर्षे झाली आहेत. या 2 वर्षांत कोकणाला काय दिलं, असा सवाल राणेंनी उपस्थित केला.  कोकणात यापुढे आमदार आणि खासदार भाजपाचे असणार असं सांगत महाराष्ट्रात भविष्यात आमचं सरकार येणार, असा दावा देखील नारायण राणे यांनी केला. आगामी निवडणूकीत भाजपाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, असं त्यांनी सांगितलं.