Inzamam-Ul-Haq on Rohit Sharma : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. उद्या टीम इंडियाचा सामना साऊथ अफ्रिकाविरुद्ध होणार आहे. अशातच आता भारताच्या प्रगतीमुळे पाकिस्तानला ठसका लागल्याचं पहायला मिळालं होतं. पाकिस्तानची माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने टीम इंडियावर बॉल टेम्परिंगचा आरोप केला होता. त्यानंतर रोहित शर्माने देखील इंझीच्या आरोपाला उत्तर दिलं होतं. डोक्याचा वापर करण्याचा सल्ला रोहितने दिला होता. त्यावर आता इंझमाम-उल-हकने रोहित शर्माला खडेबोल सुनावले आहेत.
इंझमाम यांच्या याबाबत आता मी काय बोलू शकतो... आम्ही इथं इतक्या तीव्र उष्णतेत खेळतोय. विकेट्स देखील ड्राय आहेत. अशाच चेंडू सहजतेने रिव्हर्स स्विंग होतोय. हे फक्त आमच्या नाही तर सर्वच टीमच्या बाबतीत घडतंय. त्यामुळे डोकं वापरण्याची गरज आहे. आपण इंग्लंड ऑस्ट्रेलियात खेळत नाही, तर वेस्ट इंडिजमध्ये खेळतोय, असं रोहित शर्माने म्हटलं होतं. रोहितचं हे उत्तर ऐकून इंझमाम उल हकची बोबडी वळल्याचं पहायला मिळतंय.
इंझमाम-उल-हक म्हणतो...
रोहितच्या उत्तराने इंझमामला संताप अनावर झाला. मला रिव्हर्स स्विंगबद्दल शिकवू नको, असं म्हणत इंझमामने रोहितला झापलं. आम्ही आमचं डोकं नक्की वापरू. पण तू तुझ्या डोक्याचा वापर कर. बॉल किती उष्णतेत रिव्हर्स स्विंग होतो. हे आम्ही जगाला शिकवतो, त्याना या गोष्टी सांगू नये, असं रोखठोक उत्तर इंझमामने रोहितला दिलं आहे. मी बॉल टॅम्परिंग केलं असं म्हणालो नाही. तर मी पंचांना सल्ला दिला होता, असं म्हणत इंझमामने यु-टर्न घेतला आहे.
दरम्यान, रोहितने मला फक्त डोकं वापरण्याचा सल्ला दिला. पण मी डोकं आणि डोळे उघडे ठेवण्याचा सल्ला दिला आहे, असं म्हणत इंझमामने रोहितला टोला लगावला आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता या प्रकरणावरून वातावरण तापलेलं असताना आता टीम इंडियाने फायनलपूर्वीची प्रेस कॉन्फरेन्स रद्द केली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया देखील उंचावल्या आहेत.