भाजपात आलबेल, नंदूरबारमध्ये जबाबदारी झटकण्याचे नेत्यांचे काम

नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात तीन नगरपालिका आणि एक नगरपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे

Updated: Nov 30, 2017, 11:12 PM IST
भाजपात आलबेल, नंदूरबारमध्ये जबाबदारी झटकण्याचे नेत्यांचे काम  title=

नंदूरबार : नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात तीन नगरपालिका आणि एक नगरपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. या चारपैकी तीन ठिकाणी भाजपने नेत्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. नंदूरबार नगरपालिकेच्या नेतृत्वावरून मात्र घोळ निर्माण झाला आहे. मंत्री जयकुमार रावल आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी एकमेकांकडे बोट दाखवत या पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी घेण्यास चालढकल सुरु केली आहे. 

यांच्यावर जबाबदारी

नंदूरबार जिल्ह्यातल्या नंदूरबार, नवापूर आणि तळोदा या नगरपालिकांची तर धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय. या चारही ठिकाणी भाजप, काँग्रेससमोर प्रमुख विरोधक आहे. भाजपनं नवापूरची जबाबदारी खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर सोपवलीय तर तळोद्याची जबाबदारी आमदार उदेसिंग पाडवी यांच्यावर सोपविण्यात आलीय. 

एकमेकांकडे बोट दाखविण्यावर भर

नंदूरबार पालिकेची जबाबदारी आमदार डॉ. विजयकुमार गावितांना सोपवली असली तरी त्यांनी यात रस दाखवलेला नाही. डॉ. गावितांनी या निवडणुकीची जबाबदारी मंत्री जयकुमार रावल यांना सोपवावी असा आग्रह धरला आहे तर मंत्री रावल यांनी गावित परिवाराकडेच ही जबाबदारी सोपवावी असं पक्षाला कळवलंय. त्यामुळे स्थानिक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची अडचण झालीय. मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.  

लक्ष शिंदखेडा पालिकेवर

मंत्री जयकुमार रावल हे आपल्या मतदार संघातील शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी उतरले आहेत. रावलांनी पूर्ण लक्ष शिंदखेड्यात एकवटले आहेत तर तळोद्यात आमदार पडवीच्या नेतृत्वाला स्वपक्षीय नेत्यांनीच सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नंदूरबार आणि तळोदा पालिकेत भाजप पक्ष नेतृत्वाच्या बाबतीत संभ्रमात आहे. भाजपात आपसात एकमत नसल्यचा फायदा मात्र काँग्रेस घेत आहे. 

... तर भाजपचा पराभव

भाजपनं एकदिलानं काम न केल्यास अनेक ठिकाणी पक्षाचे नेते जयातून पराजय ओढून आणतील असे दिसून येत आहे. नंदूरबारकर मात्र नेत्यांमधील आपसी संघर्षावर काही बोलायला तयार नाहीत. मतपेटीतच आपलं मत व्यक्त करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. त्यामुळे जो एकसंघ दिसेल तोच जिंकेल अशी परिस्थितीत नंदूरबारमध्ये आहे.