ही वृत्ती कधी बदलणार! तो तिच्यावर वार करत होता आणि लोकं बघत राहिली... वसई हादरली

Vasai Murder Video: प्रियकराने प्रेयशीची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 18, 2024, 03:16 PM IST
ही वृत्ती कधी बदलणार! तो तिच्यावर वार करत होता आणि लोकं बघत राहिली... वसई हादरली title=
Boyfriend Stabs Girlfriend to Death but no one help her in Vasai Caught on CCTV Video Viral

Vasai Murder Video: वसईत दिवसा-ढवळ्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीवर लोखंडी पान्याने वारंवार वार केले. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. वसई पूर्व येथील चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबईनजीकच्या शहरात अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे तरुण तिच्यावर वार करत असताना नागरिक हे दृश्य पाहूनही काहीच न घडल्यासारखे पुढे जात होते. कोणीच आरोपीला थांबवले नाही. 

दोन वर्षांचे नाते तुटले, दोघांचे ब्रेकअप झाले याच रागात आरोपी होता. गेल्या काही वर्षांपासून ते शेजारी शेजारी राहत होते. गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्यात वाद-विवाद होते. त्यामुळं त्यांचे ब्रेकअप झाले. पण आरोपीला संशय होता की तरुणीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध होते. त्याच रागातून आरोपीने तिच्यावर इंडस्ट्रीअल पान्याने वार केले. आरोपीने तिच्यावर तब्बल 15-16 वार केले. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आले आहेत. मुलीवर वार होत असताना एकाही नागरिकाने पुढे येऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. काही नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेत होते. जर नागरिकांनी आरोपीला विरोध केला असता तर आज कदाचित ती तरुणी जिवंत असती. 

सीसीटिव्ही फुटेजमध्ये, पीडीत तरुणी रस्त्यावरुन जात असताना आरोपी मागून येतो आणि तिच्या डोक्यात वार करतो. त्यानंतर ती खाली कोसळल्यानंतर तो आणखी तीव्रतेने तिच्यावर वार करतो. तो वार करत असताना सुरुवातीला एक गृहस्थ त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तो त्यांनाही न जुमानता तिच्यावर वार करणे सुरूच ठेवतो. मात्र हा प्रकार पाहून आजूबाजूला जमलेले लोक फक्त घडलेला प्रकार बघत असतात. तर, काही नागरिक लोक ये-जा करताना दिसत आहेत. परिसर गजबजलेला आहे आरोपी तिच्यावर वार करतोय तरीदेखील लोक हे दृश्य पाहत पाहत पुढे जात आहेत. मात्र कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा पोलिसांना याबाबत माहितीही कळवली नाही. लोकं दुर्लक्ष करुन पुढे निघून जात होते. लोकं गुन्हा घडताना पाहून आरामात दुर्लक्ष करुन पुढे निघून जात आहेत. 

वसई हत्याकांड प्रकरणात सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया 

वसईमध्ये झालेल्या तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप उडवणारी आहे.दिवसाढवळ्या तरुणीची अशी हत्या होते, आणि लोक बघत राहतात हे सगळं चित्र विदारक आहे. महाराष्ट्राची राजधानीच्या जवळ इतकी गंभीर आणि भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 

प्रवीण दरेकर यांनी दिली प्रतिक्रिया

अशाप्रकारे घटना झाल्यावर संवेदनशील भावनेने नागरिकांनी भूमिका निभावण्याची आवश्यकता आहे. काही लोक जेव्हा अपघात घडतात दुर्घटना घडते तेव्हा समोर असून सुद्धा सहभाग घेत नाही या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून माणुसकी हरवणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायला हवी, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दिल्ली हत्याकांडाची पुनरावृत्ती

वर्षभरापूर्वी दिल्लीत 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आली होती. आरोपीने गजबजलेल्या वस्तीतच अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केला. त्याने तिच्यावर तब्बल 40 वार केले. त्यानंतर चार वेळा तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तेव्हाही हा गुन्हा घडत असताना नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. जर लोकांनी वेळीच एकत्र येऊन आरोपींला थांबवले असते तर कदाचित तीचा जीव वाचला असता. वसईतील प्रकरणातही नागरिकांनी तिला थोडे सहकार्य केले असते तर कदाचित आज ती तरुणी जिवंत असती. या सगळ्या प्रकरणानंतर ही वृत्ती कधी बदलणार असाच सवाल उपस्थित केला जात आहे.