Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Samruddhi Highway : वेगमर्यादा ओलांडून वाहने बेदरकारपणे चालवली जात असून यामुळे सातत्याने अपघात होत असल्याचे समोर आले आहे. याआधी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता

Updated: Jan 16, 2023, 02:06 PM IST
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी title=

मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा : काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (shirdi nagpur samruddhi mahamarg) अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. 11 डिसेंबर पासून सुरु झालेल्या या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर केवळ 5 तासांच पार करता येत आहे. मात्र उद्घाटनापासूनच या महामार्गावर अपघात (Accident News) सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तिघांणा प्राण गमवावे लागले आहेत. तर दोन जर जबर जखमी झाले आहेत.

बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शिवना पिसा या गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. शिवना पिसा गावाजवळ असलेल्या एका कारला मागून आलेल्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात तीन जण ठार तर 2 जण जबर जखमी झाले आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने समृद्धी मार्गावरून बाजूला हटवण्यात आली आहेत.

याआधीही दोघांचा मृत्यू

गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी समुद्धी महामार्गावर मुंबईहून नागपूरकडे येत असलेल्या कारला वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश होता. अपघात एवढा भीषण होता की, मृत मुलगी गाडीबाहेर उडून काही फूट अंतरावर जाऊन पडली.

अपघातांमागे कारण काय?

समृद्धी महामार्गावर अवजड वाहनांसाठी प्रतितास 80 किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी प्रतितास 120 किलोमीटरची वेगमर्यादा नेमूण देण्यात आली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालविणे, नियमाचे उल्लंघन करून अन्य वाहनांना मागे टाकणे अशा काही कारणांमुळे या महामार्गावर भीषण अपघात होत आहेत. 

दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी नागपूर, औरंगाबाद, पुणे विभागातील वाहतूक पोलिसांवर देण्यात आली आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडे लेझर स्पीड गन, अल्कोहोल ब्रेथ अ‍ॅनलायझर सारखी यंत्रे देण्यात आली आहेत.