योगेश खरे, नाशिक : नाशिकमध्ये गंगापूर महिरवणी रस्त्यावर एका पिकअप वाहनानं असा पेट घेतला. पाहता पाहता गाडीचा अक्षरशः कोळसा झाला. एवढंच नाही तर ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू झाला. ही गाडी अचानक का पेटली, तर याला कारण ठरली सॅनिटायझरची बाटली. डॅशबोर्डखाली सॅनिटायझरची बाटली ठेवली होती. त्याच्याच बाजूला मोबाईल चार्जिंगसाठी लावला होता. चार्जरमधून ठिणग्या उडाल्या आणि बाजूलाच असलेल्या सॅनिटायझरमुळे अख्ख्या गाडीनं एका क्षणात पेट घेतला. आग एवढ्या लवकर पसरली की ड्रायव्हरला सीटबेल्ट काढून उडी मारण्याचीही संधी मिळाली नाही. ड्रायव्हरचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
तुम्हीही तुमच्या गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा.
गाडीच्या डॅशबोर्डवर सॅनिटायझर ठेवू नका नाहीतर उन्हाच्या किरणांमुळे गाडी पेट घेऊ शकते.
मोबाईल चार्जिंग करणार असाल तर जवळ सॅनिटायझर ठेवू नका.
कुठलेही ज्वलनशील पदार्थ गाडीमध्ये ठेवणं टाळा.
धूम्रपान करणाऱ्यांनी लायटर, सॅनिटायझर जवळ ठेवू नका
वाहनांमध्ये अल्कोहोलचं कमी प्रमाण असलेलं सॅनिटायझर ठेवा
कोरोना काळात सॅनिटायझर जवळ ठेवणं आवश्यक झालं आहे. पण ते आपण कुठे ठेवतो, याबद्दलही सावध राहा.