अवघ्या २३ सेकंदात चोराला पकडण्याचा पराक्रम

चोर आरपीएफच्या जाळ्यात अलगद सापडला

Updated: Oct 8, 2018, 04:51 PM IST
अवघ्या २३ सेकंदात चोराला पकडण्याचा पराक्रम title=

नागपूर : आरपीएफनं अवघ्या २३ सेकंदात चोराला पकडण्याचा पराक्रम केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमुळे हा चोर आरपीएफच्या जाळ्यात अलगद सापडला. सुनील राय असं अटक करण्यात आलेल्या चोराचं नाव आहे.

सीसीटीव्हीद्वारे ठेवलं लक्ष

नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफ़ॉर्म क्रमांक एकवर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली. सुनील राय नावाचा हा चोर फलाटावर फिरत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं आरपीएफनं सीसीटीव्हीद्वारे त्याच्यावर लक्ष ठेवलं.

खिशातून पाकीट चोरलं

सकाळी ५ वाजून ३७ मिनिटं आणि १२ सेकंदाला सुनील रायने फलाटावर झोपलेल्या प्रवाशाच्या पँटच्या मागच्या खिशातून पाकीट चोरीला सुरूवात केली. पाकीट चोरी करुन तो काहीही घडलं नाही, अशा थाटात तिथून चालू लागला. मात्र जेमतेम १० ते १५ पावलं तो चालला असेल तेवढ्यात आरपीएफ जवानानं त्याला ५ वाजून ३७ मिनिटं आणि ३५ व्या सेकंदाला पकडलं.

अवघ्या चार मिनिटांत अटक

सुरुवातीला आपण काहीच केलं नसल्याचा दावा तो करत होता. मात्र चोरी करताना तुला सीसीटीव्हीत पाहिल्याचं सांगितल्यावर त्यानं आपला गुन्हा कबूल केला. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे एका मोबाईल चोराला नागपूर रेल्वे पोलिसांनी अवघ्या चार मिनिटांत अटक केली होती.