शिवसैनिकांची हत्या प्रकरण: नगरमधील परिस्थिती चिघळण्याची भीती

जिल्ह्यातली तणावपूर्ण परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती

shailesh musale Updated: Apr 8, 2018, 05:57 PM IST
शिवसैनिकांची हत्या प्रकरण: नगरमधील परिस्थिती चिघळण्याची भीती title=

अहमदनगर : नगर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये गोळीबारात मृत्यू पावलेल्या संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघा शिवसेना पदाधिका-यांच्या मृतदेहांचं शवविच्छेदन औरंगाबादमध्ये केलं गेलं. त्यानंतर हे मृतदेह अहमदनगरकडे रवाना करण्यात आले आहेत. मात्र या दोघांचे मृतदेह थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेणार असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. यामुळे जिल्ह्यातली तणावपूर्ण परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर केडगाव पोटनिवडणुकीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर, शिवसेना आपल्या मागणीवर आक्रमक झाली आहे. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनाही अटक करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सर्व मुख्य आरोपींना अटक केल्याशिवाय, अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका स्थानिक शिवसेना नेत्यांनी घेतली आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ही माहिती दिली आहे.

शिवसेनेच्या निषेध मोर्चाला सुरूवात

दरम्यान, आज सकाळी ११.४० वाजता शिवसेनेने आपल्या निषेध मोर्चाला अहमदनगर शहरातील दिल्लीगेटवरून सुरूवात केली. अहमदनगर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. 

२ आमदार अटकेत

यापूर्वी अहमदनगरमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि अरुण जगताप यांच्यासह अन्य चौघांना अटक करण्यात आली आहे.

२ शिवसैनिकांची हत्या

नगरच्या केडगावमध्ये शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या परिससरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने अहमदनगर बंदची हाक दिली आहे.