अनिल देशमुख यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- चंद्रकांत पाटील

घटना अत्यंत धक्कादायक.... 

Updated: Apr 21, 2020, 04:27 PM IST
अनिल देशमुख यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- चंद्रकांत पाटील

मुंबई : पालघर जिल्ह्यात झालेल्या हत्या प्रकरणावरुन आता अनेक स्तरांतून नाराजीचा सूर आळवला जात आहे. यामध्येच राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. याच दरम्यान आता गृहमंत्री अनिल देशमुख यांची राज्य मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

पालघर जिल्ह्यात पोलिस हजर असतानाही दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र पाठवत त्यांनी ही मागणी केल्याचं कळत आहे. पालघर प्रकरणावर वक्तव्य करण्यास मुख्यमंत्र्यांकडून दवडला गेलेला वेळ केंद्रस्थानी धरत वास्तविक त्यांनी या गंभीर घटनेनंतर तातडीने स्वत: जनतेशी संवाद साधायला हवा होता पण त्यांनी यासाठी चार दिवसांचा वेळ लावला असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. 

 

'राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले. लॉकडाऊनमुळे संचारबंदी असताना तसेच चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मुंबईत बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला. आता पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनांबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून वरील घटनांची निःपक्ष चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे', याच भूमिकेवर पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळालं.