'त्या' निर्णयाचा पुनर्विचार करा; सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांना विनंती

पाहा त्यांचं नेमकं मत आहे तरी काय... 

Updated: Apr 21, 2020, 03:53 PM IST
'त्या' निर्णयाचा पुनर्विचार करा; सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांना विनंती  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातलेलं असतानाच या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी म्हणून राज्य आणि केंद्र सरकारकडून अखंड प्रयत्न केले जात आहेत. पण, या साऱ्या निर्णयांमध्ये केंद्राकडून घेण्यात आलेल्या एका निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी विनंती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

'कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत देशातील गोरगरीब एकीकडे अन्नासाठी संघर्ष करीत असताना केंद्र सरकारने फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमधील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅनिटायजर आवश्यक आहे, त्याचे उत्पादन करायलाच हवे. परंतु या काळात आपले सर्वांचे प्राधान्य गरीबांचे पोट भरण्यास असायला हवे. आपण हा तांदूळ स्थलांतरीत मजूरांसाठी देऊ शकतो', असं ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा असा विनंतीपर सूर आळवला. 

कोरोना विषाणूचा देशातील वाढता संसर्ग पाहता, या परिस्थितीमध्ये पावलोपावली प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. वारंवार हात स्वच्छ धुणं, सॅनिटायझरचा वापर करणं हे त्यापैकीच काही उपाय. याच पार्श्वभूमीवर देशभरात सॅनिटायझरची मागणीही लक्षणीयरित्या वाढली. काही भागांमध्ये तर याचा तुटवडाही जाणवला. ज्यासाठी अखेर सॅनिटायझर तयार करण्यासाठी म्हणून तांदळाचा वापर करण्याचाही निर्णय घेतला गेला. पण, या साऱ्यामध्ये या निर्णयाचा पुनर्विचार केला जाणं गरजेचं असल्याचं म्हणत गोर- गरीबांच्या अन्नधान्य पुरवठ्याचा मुद्दा सुळे यांनी अधोरेखित केला. 

 

गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात रोजंदारी भत्ता आणि हातावरचं पोट असणाऱ्या वर्गाला मोठ्या प्रमाणात काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिधावाटपाच्या दुकानांमध्ये शासनाकडून यासाठी तरतूद करण्यात आलीही आहे. पण, त्यामध्ये काही सुधारणा सुप्रिया सुळे यांनी सुचवत एक नवा पर्याय पुढे मांडला आहे.