रस्तेच नाही बांधले, तरीही कोट्यवधी लुटले, सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांचा तिजोरीवर डल्ला

Scam in Road Construction : कागदावरच असलेल्या रस्त्यांसाठी कोट्यवधी लाटल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलाय. यातून सरकारची फसवणूक करण्यात आली आहे. 

Updated: Apr 27, 2023, 09:07 PM IST
रस्तेच नाही बांधले, तरीही कोट्यवधी लुटले, सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांचा तिजोरीवर डल्ला  title=

विशाल करोळे, झी मीडिया छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात (Rural Areas) नेहमीच रस्त्यांची बोंबाबोंब असते. रस्ते असले तरी खड्ड्यांमध्ये वाहनधारकांना रस्ता शोधावा लागतो. रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी (Funding of Crores for Roads) येतो तरीही ग्रामीण भागात रस्ते होत नाही. मग हे पैसे जातात कुठे. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Smabhjinagar) मध्ये उघड झाला आहे. कागदावरही नसलेल्या 73 रस्त्यांसाठी 10 कोटींचा खर्च दाखवण्यात आला आणि सर्व निधी अभियंत्यांनी (Engineers) आपल्या खिशात घातला. संभाजीनगर जिल्ह्यात 2009 ते 2016 या कालावधीत रोजगार हमी योजनेअंतर्गतल्या (Rojgar Hami Yojana) रस्त्याच्या कामात हा घोटाळा झाला. (Scam in Road Construction)

हा सगळा घोटाळा नेमका कसा झाला? पाहुयात.. 
रोजगार हमी योजनेअंतर्ग फुलंब्री तालुक्यात 42 रस्त्यांची 5 कोटी 50 लाख 46 हजारांची बनावट बिलं सादर करण्यात आली. तर सिल्लोड तालुक्यातील 31 रस्त्यांसाठी 4 कोटी 56 लाख 54 हजारांची बनावट बिलं अभियंत्यांनी सादर केली. अतिशय दुर्गम भागातील रस्ते यासाठी निवडण्यात आले. काही ठिकाणी गावात पायी चालण्याचा रस्ता होता तिथं ही रस्ते बांधल्याचे दाखवण्यात आलं. आमदार निधीतून झालेले रस्ते रोजगार हमी योजनेतून केल्याची बनावट बिलं सादर करण्यात आली. 

बनावट बिल सादर करून कोषागारातून 10 कोटी 7 लाख रुपये उचलण्यात आले. बिलं अदा करण्यात आल्यानंतर कोषागारातून बिलं गायब झाली. दक्षता समितीला कामाचा अभिलेखही सापडला नाही. हा घोटाळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आला. चौकशीनंतर 6 अभियंत्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

6 पैकी एक अभियंता निवृत्त झालाय तर 5 जण अजूनही सेवेत आहेत, आता यांच्या वर कठोर कारवाई होईल सुद्धा,मात्र ग्रामीण भागात रस्त्यांच्या नावाने अशा पद्धतीची फसवणूक होत असेल तर हा प्रकार दुर्दैवी म्हणावा लागेल, यातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मिळणार तरी कशा असा प्रश्न आहे.