Indigo मध्ये बिझनेस क्लासचा प्रवास सुरु; विचारही केला नसेल इतकं स्वस्त आहे तिकीट

Indigo Business Class: नव्यानं सुरू झालेल्या बिझनेस क्लाससह आता इंडियो देणार एअर इंडियाला टक्कर.... जाणून घ्या तिकीट दर आणि इतर माहिती...   

सायली पाटील | Updated: Nov 15, 2024, 11:55 AM IST
Indigo मध्ये बिझनेस क्लासचा प्रवास सुरु; विचारही केला नसेल इतकं स्वस्त आहे तिकीट  title=
Indigo airlines begins Business Class know ticket rates and other details

Indigo Business Class: भारतातील विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या कार्यपद्धती आणि सुविधांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यपूर्ण बदल पाहायला मिळाले. प्रवाशांच्या हितासह जागतिक स्तरावरील सुविधांशी बरोबरी करण्याच्या हेतूनं विमानसेवांमध्येही काही प्रगतीशील निर्णय घेण्यात आले. इंडिगो एअरलाईन्सही यात मागे नाही. 

तिथं एअर इंडिया आणि विस्ताराचं विलिनीकरण झालेलं असतानाच इथं इंडिगोनं एका नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. हे क्षेत्र म्हणजे बिझनेस क्लासचं. 14 नोव्हेंबरपासून दिल्ली- मुंबई या मार्गावरील विमानामध्ये इंडिगोनं बिझनेस क्लास श्रेणीची सुरुवात केली. पहिल्याच फ्लाईटमध्ये इंडिगोनं 12 बिझनेस क्लास तिकीटं दिली आणि आता थेट एअर इंडियाशीच स्पर्धेत उडी घेतली. 

सामान्यांनाही विमानप्रवास सोयीचा आणि खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणाऱ्या इंडिगोनं गुरुवारी दिल्ली मुंबई मार्गावरील विमानात पहिल्यावहिल्या बिझनेस सीट सुविधेचं अनावरण केलं. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी लिंक्डइनवर यासंदर्भातील माहिती दिली. 

'एक नवा अध्याय सुरू होतोय, दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या आमच्या या उड्डाणामध्ये आम्ही पहिल्यावहिल्य़ा बिझनेस श्रेणीतून प्रवासाचा आनंद घेतोय', असं या कंपनीकडूनच सांगण्यात आलं. इंडिगोकडून देण्यात येणाऱ्या या बिझनेस क्लास सुविधेमध्ये प्रवाशांना वर्ल्ड क्लास कंफर्टेबस सीट आणि इतर सुविधा दिल्या जातील. याशिवाय सोबत नेल्या जाणाऱ्या सामानाची मर्यादासुद्धा वाढवून दिली जाईल. प्राथमिक स्तरावर दिल्ली- मुंबई मार्गासाठी इंडिगोनं प्रवाशांकडून प्रति तिकीट 18018 रुपये इतकी रक्कम आकारली आहे. इतर विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून आकारला जाणारा तिकीट दर पाहता इंडिगोचे हे दर कमीच असल्याचं स्पष्ट होत आहे.

हेसुद्धा वाचा : जगातली सर्वात महागडी बिअर; किंमत इतकी, की सहज खरेदी करु शकाल बंगला- लक्झरी कार  

इंडिगोच्या वतीनं प्राथमिक स्तरावर ए-321 नियो एयरक्राफ्टमध्ये 12 बिझनेस क्लास सीट देत या नव्या टप्प्याची सुरुवात केली असून, येत्या काळात देशातील इतरही बिझनेस रुटवर कंपनीकडून बिझनेस क्लासची सुविधा दिली जाईल. तेव्हा आता प्रवासी या उपक्रमाला नेमका कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल.