विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : आजची रात्र पृथ्वीवरच्या सगळ्यांसाठीच विशेषतः भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण चीनची एक अंतराळ प्रयोगशाळा भारताच्या भूमीवर कोसळण्याची शक्यता आहे. कुठल्याही क्षणी ही प्रयोगशाळा पृथ्वीच्या कक्षेत शिरेल. ती कुठे कोसळण्याचा धोका आहे. चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक सध्या पृथ्वीच्या दिशेनं झेपावत आहे. दोन एप्रिल 2018 रोजी सकाळी पावणे सातपर्यंत चीनचं हे आंतराळस्थानक पृथ्वीवर कोसळू शकतं, असा अंदाज आहे.
युरोपातल्या शास्त्रज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. पहाटे 2:08 च्या सुमाराला अरबी समुद्राच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या महाराष्ट्रातल्या कुणकेश्वर या गावावरुन भारताच्या आकाशात दाखल होणार आहे.
भारताच्या दृष्टीने २ एप्रिल 2018 रोजी पहाटे 2:08 ते 2:12 ही वेळ महत्त्वाची ठरणार आहे. हे अंतराळ स्थानक समुद्रात पडेल, असं सांगण्यात येतंय. मात्र ते जमिनीवर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
धक्कादायक बाब म्हणजे ज्या भागात हे अंतराळ स्थानक कोसळेल, असा अंदाज आहे, त्यात भारताचाही समावेश आहे. जगभरातल्या तमाम अवकाश संशोधन संस्था या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. ताशी 28 हजार किलोमीटर वेगानं पृथ्वीच्या वातावरणात शिरताना तियाँगगाँग 1चे अनेक तुकडे होतील. त्यातील बराचसा भाग वातावरणाशी घर्षण होऊन जळून खाक होण्याचीही शक्यता आहे.
1979 मध्ये स्कायलॅब हे अमेरिकन अंतराळ स्थानक अशाचप्रकारे पृथ्वीवर कोसळलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियात त्याचे छोटे तुकडे विखुरले होते. तियाँगगाँग 1 च्या निमित्तानं स्कायलॅबच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे. आता तियाँगगाँग 1 चा हा प्रवास नेमका कसा होणार आणि ते कुठे कोसळणार, याचं उत्तर रात्रीतच मिळणार आहे.