मुख्यमंत्री आणि भुजबळ जेव्हा एकाच मंचावर समोरासमोर आले....

 छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर आमने-सामने आले.

Updated: Jul 3, 2018, 11:07 PM IST
मुख्यमंत्री आणि भुजबळ जेव्हा एकाच मंचावर समोरासमोर आले.... title=

नाशिक : भ्रष्टाचाराच्या आरोपातून नुकतेच जामीनावर तुरूंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी गडावर आमने-सामने आले. देवेंद्र फडणवीस यांच सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर, छगन भुजबळ यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. भ्रष्टाचार प्रकरणी छगन भुजबळ दोन ते अडीच वर्ष तुरूंगात होते. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत.

मात्र मंगळवारी वणी येथील सप्तश्रृंगी गडावर रोप-वे च्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर आमने-सामने आले. गृहविभागाचा कार्य़भार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच आहे, आणि फडणवीस यांच्या काळात छगन भुजबळ यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीही झाली आणि त्यांना अटक देखील झाली.

छगन भुजबळ तुरूंगातून बाहेर आल्यानंतर ते आणि मुख्यमंत्री पहिल्यांदा या कार्यक्रमात आमने सामने आले. यावेळी मात्र मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्यात काय बोलणं होतं का याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं, पण त्यांच्यात कोणतीही बातचित झाली नाही. एकवेळ अशीही आली की भुजबळ आणि फडणवीस यांच्या मधोमध गिरीश महाजन यांना जागा देण्यात आली होती. मुख्यमंत्री गिरीश महाजनांशी बोलत होते, तर काही वेळाने भुजबळ गिरीश महाजनांशी, मात्र भुजबळ आणि फडणवीस यांचा थेट संवाद मंचावर दिसून आला नाही.