Black and White: महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झालाय; अशोक चव्हाण असं का म्हणाले?

Ashok Chavan Black and White Interview: सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे ते घृणास्पद, अत्यंत वाईट पद्धतीनं सुरू आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झाला आहे, असं देखील अशोक चव्हाण यावेळी म्हणाले..

Updated: Feb 22, 2023, 07:39 PM IST
Black and White: महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झालाय; अशोक चव्हाण असं का म्हणाले? title=

Ashok Chavan in Black and White: महाराष्ट्राच्या राजकारणात गँगवॉर (Political Gangwar) सुरू असल्याचं आपल्याला वाटत आहे, असं वक्तव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमात मुख्य संपादक निलेश खरे यांनी अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर जाहीर नाराजी व्यक्त केली. असं राजकारण न केलेलं बरं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

"आजच्या सध्याच्या राजकीय स्थितीत महाराष्ट्रात काँग्रेसच असा एक राजकीय पक्ष आहे, जिथे टोकाची भूमिका घेतली जात नाही. याउलट इतर पक्षांशी समन्वय साधत, संवाद ठेवत समतोल साधला जात आहे. आमची व्यवस्थित काम करण्याची भूमिका लोकांनी पाहिली असून ते कौतुक करत असतात. काँग्रेसमध्ये काहीतरी वर्किंग कल्चर आहे आणि वैचारिक भूमिका लोकांना पटते. सध्या जे सुरु आहे ते घृणास्पद, वाईट आहे. काँग्रेसने कधीही याला खतपाणी घातलेलं नाही किंवा या गँगवॉरमध्ये गेलेली नाही," असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. 

राजकारणाचं गँगवॉर होत आहे असं तुम्हाला वाटत आहे का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले "हो, निश्चितच वाटत आहे. सध्या देशात जी काही स्थिती आहे, ते एक वॉर आणि कंसात गँगवॉर लिहिण्यासारखीच आहे. एकमेकांना वैचारिक भूमिकेतून विरोध करा हे अनेक दिवस मी सांगत आहे". 

"विरोधकांचे संबंध कसे हवेत यासाठी देश पातळीवर उदाहरण द्यायचं झालं, तर एकेकाळी राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तम संबंध होते. पक्ष वेगळे असल्याने सभागृहात एकमेकांविरोधात भूमिका मांडल्या असतील. पण युट्यूबवर अटलबिहारी वाजपेयी यांची एक व्हिडीओ आहे, ज्यामध्ये त्यांनी मला किडनीचा आजार झाल्यानंतर उपचारासाठी मला अमेरिकेत जायचं होतं, पण आर्थिक स्थिती नव्हती. राजीव गांधी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत: मला अमेरिकेत पाठवलं आणि सरकारने सगळा उपचाराचा खर्च केला असं सांगितलं आहे. राजीव गांधी यांच्या निधनानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी ही गोष्ट सांगितली होती," अस अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

"याआधीही सभागृहात वैचारिक मतभेदातून आरोप-प्रत्यारोप होत होते. पण सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर एक वेगळं वातावरण असायचं, एकमेकांबद्दल आदर असायचा. आज सर्व संपलं आहे. आपण एकमेकांचे वैयक्तिक शत्रू असल्यासारखे वागत असून एकमेकांना संपवण्याची भाषा सुरु आहे. हे काही बरोबर नसून, असं राजकारण न केलेलं बरं अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे," अशी खंतही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.