Bhagat Singh Koshyari Controversial statement: जाता जाता केला इशारा... वक्तव्याप्रमाणे भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शेवटच्या क्षणीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. मात्र, जाता जाता त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रातली लोकं आमच्या पहाडी लोकांसारखी सज्जन आहेत मात्र शहरात गुंडगिरी करणारी काही दाऊदसारखी लोकं आहेत असं विधान भगतसिंह कोश्यारींनी केले आहे. उत्तराखंडमधल्या नागरिकांच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली त्यात त्यांनी वादग्रस्त विधान केले.
कोश्यारी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रबद्दल प्रेम व्यक्त केले. महाराष्ट्रचे लोक आमच्या पहाडी लोकांसारखे चांगले आहेत. पण शहरात काही गुंडगिरी करणारे दाऊद सारखे लोक असतील असे कोश्यारी म्हणाले. मी मराठी वाचतो. तर मराठी आणि पहाडी भाषेत अनेक शब्द मिळते जुळते आहेत. आमच्याकडे पांडे आहे इकडे देशपांडे आहेत. इथे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहेत असं कोश्यारी म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर केला आहे. राज्यपाल कोश्यारी हे अनेक वादग्रस्त वक्तव्यावरुन वादाच्या भोव-यात सापडले होते. तेव्हा कोश्यारींचा राजीनामा घ्या अशी मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आणि विरोधकांनीही केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 जानेवारीला मुंबई दौरा संपन्न झाला होता. या दौऱ्यानंतर राज्यपाल पद सोडण्याची इच्छा भगतसिंग कोश्यारांनी व्यक्त केली होती.
राज्यपालांनी भाजपचे एजंट म्हणून काम केलं, त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना पायउतार व्हावं लागल्याची टीका राऊतांनी केली आहे. तर, नवे राज्यपाल हे बैस आहेत की बायस? त्यांनी घटनेनुसार काम केलं तर स्वागतच आहे असं म्हणत राऊतांनी बैस यांच्यावर उपरोधिक टोला लगावला आहे. तर, भगतसिंह कोश्यारींना भाजपनं दिलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं काम पूर्ण झालं, म्हणून राज्यपालांचा राजीनामा मंजूर केल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटले आहे.
आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली झाली, महाराष्ट्राची सुटका झाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली. भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजुर झाल्यानंतर विविध पक्ष, संघटनांकडून आंनदोत्सव साजरा करण्यात आला. पुण्यात मराठा क्रांती मूक मोर्चा आणि राष्ट्रवादीतर्फे पेढे वाटण्यात आले.
राज्यपालांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना दोन राजेंमध्ये जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले आह. सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे असं म्हणत संभाजीराजेंनी राज्यपालांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.खरंतर दोन महिन्यांपूर्वी हा निर्णय घ्यायला हवा होता. सुसंस्कृत राज्याची राज्यपालांनी घडी मोडलीय, आता नव्या राज्यपालांनी जुन्या चुका ज्या झाल्या, त्या लक्षात ठेवाव्या असं संभाजीराजेंनी म्हटलंय. तर महाराजांवर टीका करणा-यांची लायकी काय, असा सवाल उदयनराजे यांनी केलाय.
राज्यपालांनी चिंतन मनन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधिर मुनगंटीवारांनी दिली. विरोधी पक्षाने सर्व मर्यादा ओलांडून त्यांच्यावर टीका केल्याची खंत मुनगंटीवारांनी व्यक्त केली.