प्रफुल्ल पवार / रायगड : अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे बुधवारी झालेल्या राडाप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी ३२ ते ३४ ग्रामस्थानवर गुन्हा दाखल केला आहे. गावात कोरोनाचे ७२ रुग्ण आढळूनही ग्रामस्थ यंत्रणेला सहकार्य करत नव्हते आणि नियम पाळत नाहीत म्हणून तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी हे ग्रामस्थाना समजावण्यासाठी गेले होते. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले आणि अधिकारी कर्माचाऱ्यांच्या अंगावर धावत जात त्यांना अखेर पिटाळून लावले. या ग्रामस्थांनी सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
रायगडमधील बोडणी येथील राडा प्रकरणी 32 ते 34 ग्रामस्थानवर मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । कोरोना जागृतीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर राडा । ग्रामस्थांनी अधिकारी , यंत्रणेला लावले होते पिटाळून । जिल्हाधिकारी यांनी घेतली गंभीर दखल https://t.co/zUoGCpBnnh@ashish_jadhao pic.twitter.com/DH4qQ8Vs7a
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 23, 2020
राज्य सरकारकडून कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र केला आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशीही विनंती करण्यात येत आहे. दरम्यान, बोडणी येथील ग्रामस्थांनी सहकार्याची कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला होता. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली असून कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या होत्या. त्यानुसार विरोधक करणाऱ्या ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे. साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल केला असून सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मराज सोनके याचा तपास करीत आहेत. त्याचबरोबर बोडणी येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कंटेन्मेंट झोनचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत.
दरम्यान, अलिबाग तालुक्यात कालपर्यंत ७३९ कोरोना रुग्ण नोंद करण्यात आले आहेत. त्यातील तब्बल ७२ रूग्ण एकटया बोडणी गावात आहेत. तेथील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांना कोरोनाबाबत काय खबरदारी बाळगावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ , गटविकास अधिकारी दीप्ती पाटील , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे , सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी सकाळी ११ वाजता गावात पोहोचले . तेव्हा ग्रामस्थांनी अक्षरशः धिंगाणा घातला. ३०० ४०० ग्रामस्थ आणि महिलांचा जमाव अधिकाऱ्यांवर , कर्मचाऱ्यांवर धावून आला. त्यात महिला अग्रभागी होत्या. आम्हाला शासनाकडून आरोग्य विषयक कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. त्या सुविधा आधी द्या नंतरच तुम्ही या, असा पवित्रा घेत भंडावून सोडले. यावेळी आक्रमक झालेले ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
यानिमित्ताने कायदा सुव्यवस्थेची मोठी समस्या निर्माण झाली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र परीस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार व अन्य यंत्रणांनी तेथून मागे हटण्याचा निर्णय घेतला. कोरोनाबाधित रूग्णांना आणण्यासाठी गेलेली रूग्णवाहिकादेखील रिकामीच परत आली. त्यानंतर मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी धर्मराज सोनके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले , सविस्तर चर्चा केली . त्यानंतर ग्रामस्थ काहीसे शांत झालेत.