राज्यात आज कोरोना लसीकरणाची दुसरी ड्राय रन

एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांचं लसीकरण 

Updated: Jan 8, 2021, 08:13 AM IST
राज्यात आज कोरोना लसीकरणाची दुसरी ड्राय रन title=

मुंबई : राज्यातील ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज, कोरोना लसीकरणासाठी दुसरी ड्राय रन (Corona Vaccine second dry run) मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन, तर प्रत्येक महापालिका क्षेत्रात एका आरोग्य संस्थेत ड्राय रन घेण्यात येणार आहे. /यापूर्वी २ जानेवारी महाराष्ट्रातील चार राज्यात ही मोहिम राबवण्यात आली होती. 

२ जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या चार जिल्ह्यांत तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली होती. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज लसीकरणाची ड्राय रन घेतली जाणार आहे. या मोहिमेसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांचं लसीकरण होणार आहे. 

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा तिसरा टप्पा यशस्वी झाला आहे. पण याआधीच भारत बायोटेकच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आज भारतात लसीची दुसऱ्यांदा रंगीत तालीम होत आहे. तर या सर्व लसींच्या ट्रान्सपोर्टेशनलाही लवकरच सुरुवात होते आहे.

भारतात सर्व दुर्गम भागांमध्ये लस पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या वाहतूक ताफ्यातील विमानांचा वापर करण्यात येणार आहे. यात C-130J आणि AN-32 सारखी मोठी विमाने लसी पोहोचवण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. भारतात दोन करोना प्रतिबंधक लसींना मर्यादीत आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.

यात सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे. लस उत्पादकांनी विशेष कंटेनर्सची व्यवस्था केली आहे. वाहतुकी दरम्यान लसी अपेक्षित तापमानात स्टोअर करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.