हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : नॉन व्हेज खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यातच खेकडे खाणारेही मोठ्या प्रमाणात आहेत. अशीच गरज ओळखून पुण्यातील दोन शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून ते मोठ्या प्रमाणात नफा ही कमावत आहे.
खेकडे म्हटलं की, सर्वांना आठवतात समुद्र, नदी, धरण याच ठिकाणी खेकडे मिळतात. परंतु पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील मेंगाळवाडी येथील वारे कुटुंबाने हीच गरज ओळखत आपल्या पारंपरिक शेती व्यावसायाला जोड धंदा म्हणून खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू केला. सध्या सर्वत्र शेतकरी हवालदिल झालाय, शेतीला उत्पन्न नाही तर कुठे बाजारभाव नाही, दुसरीकडे मात्र शेतकरी आधुनिक पद्धतीचा अवलंब करत शेतीला जोड व्यवसाय करत नफा कमवत आहेत. सतिष वारे व त्यांचे बंधू शांताराम वारे देखील परंपरागत शेती करत होते. मात्र, शांताराम आणि सतीश या दोन्ही भावांनी शेतीला जोडव्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.
घरात अवघी दीड एकर शेती असताना दोघांनी गोड पाण्यात खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. खेकडे खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून पुरवठा होत नसल्याने वारे कुटुंबाने हा व्यवसाय सुरू केला. त्यांना या व्यवसायात यशदेखील आले. मोठ्या प्रमाणावर त्यांचा या व्यवसायातून नफा देखील होत आहे.
शांताराम आणि सतीश या दोघांनी खेकडे पालन व्यवसायाबद्दल इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेतली. शेती व्यवसायात हा वेगळा खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला श्रम आणि जागा कमी लागते. एका मोठ्या पाण्याच्या टाकीत देखील हा व्यवसाय सुरू करता येतो. या टाकीमध्ये दर १५ दिवसांनी पाणी बदलावे लागते. सोबतच सोशल मीडियाचा वापर करत आणि इतर यंत्र वापरत मार्केटिंग केली जात असून मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आहे. त्यांना हे खेकडे विकण्यासाठी कुठे फिरावे लागत नसून त्यांना घरीच दररोज ३० ते ४० किलो खेकड्यांसाठी ग्राहक येतं असल्याचे वारे बंधू सांगतात.
शेतीला जोड व्यवसाय करावा पण तो बाजारातील मागणी व पुरवठा पाहून, त्यातच इंटरनेटचा फायदा घेतला तर शेतकऱ्यांनादेखील यश नक्कीच मिळेल, हे या वारे कुटुंबीयांनी दाखवून दिलं. याचाच आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतला तर इतर शेतकऱ्यांनाही या व्यवसायातून लाखो रुपये कमवता येऊ शकतात.