'ही तर बौद्धिक दिवाळखोरी', खेकड्यांच्या विधानावर सावंतांचा राज्यभर निषेध

'चिपळूणमधील तिवरे धरण हे निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नव्हे तर खेकड्यांमुळे फुटले', राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा अजब दावा

Updated: Jul 5, 2019, 05:48 PM IST
'ही तर बौद्धिक दिवाळखोरी', खेकड्यांच्या विधानावर सावंतांचा राज्यभर निषेध title=

मुंबई : तिवरे धरणफुटीला खेकडे जबाबदार असल्याचं विधान जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केल्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी विरोधकांनी सावंतांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनं केली आहेत. तर विरोधी नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. सरकारनं धरणफुटीच्या चौकशीसाठी एसआयटी नेमलेली आहे. मात्र मंत्रीमहोदयांनी त्याआधीच खेकड्यांना जबाबदार धरल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय. शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाणच या धरणाचे ठेकेदार होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत असताना शिवसेनेच्याच मंत्र्यांनी त्यांना पाठीशी घालताना थेट खेकड्यांनाच जबाबदार धरलं.

'ही तर बौद्धिक दिवाळखोरी'

खेकड्यांमुळे धरण फुटलं, असं म्हणणं ही बौद्धिक दिवाळखोरी आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी दिलीय. खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटल्याचं जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं. त्यावर पांढरे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. मुळात तिवरे धरणाची रुंदी आठशे ते एक हजार फूट असल्यावर खेकडे एवढं मोठं बांधकाम पोखरू कसं शकतात, असा सवाल त्यांनी केलाय

'त्या खेकड्यांना अटक करा'

'धरण फोडणारे खेकडे पळून जात होते. या खेकड्यांना आम्ही पकडलं असून, यांना अटक करा', अशी खोचक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तिवरे धरण दुर्घटनेनंतर जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस समाचार घेतलाय. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीसांच्या हातात खेकडे देत या खेकड्यांनी धरण फोडलं असून, त्यांना अटक करा अशी मागणी केली.

खेकड्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन आंदोलन

तिवरे धरण दुर्घटनेला खेकडे जबाबदार असल्याचं वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध करत आज कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं अभिनव पद्धतीनं आंदोलन केलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहेबूब शेख यांनी आरोपी म्हणून चक्क खेकड्यांना शाहुपुरी पोलिसांच्या हवाली केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.

तानाजी सावंतांना साक्षात्कार

रत्नागिरीतलं तिवरे धरण का फुटलं, याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं एसआयटी नेमली आहे. मात्र जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी एसआयटी चौकशीआधीच धरणं का फुटलं, याचा गौप्यस्फोट केला. 'चिपळूणमधील तिवरे धरण हे निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नव्हे तर खेकड्यांमुळे फुटले', असा अजब दावा राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला. ते गुरुवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांनी सांगितल्यानुसार धरणाची दुरुस्ती केली होती. मात्र, याठिकाणी खेकड्यांचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने धरण फुटले, असं अजब वक्तव्य त्यांनी केलं होतं.एकीकडं या धरणाचे कंत्राटदार आणि शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी होतेय. तर दुसरीकडं खेकड्यांमुळं हे धरण फुटल्याचा साक्षात्कार शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांना झालाय.