किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : स्वच्छ प्रतिमेचे आणि देशातील युवकांचे आयकॉन असलेले डॅशिंग पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील नाशिकला पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले. नांगरे पाटील आल्यावर गुंडांना सळो की पळो करून सोडतील असं अनेकांना वाटलं होतं. मात्र घडतय उलटंच, शहरात घरफोड्या, दुचाकीचोर आणि खंडणीखोरांनी दहशत निर्माण करत धुमाकूळ घातलाय. त्यामुळे डॅशिंग पोलीस अधिकारी करतायत काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
म्हसरुळच्या जुईनगर इथे प्रशांत साळुंखे यांचं किराणा दुकान आहे. सहा महिन्यांपासून खंडणीसाठी त्यांना धमक्या येत आहेत. तक्रार दाखल करूनही आरोपी मोकाटच आहे. मात्र चार दिवसांपूर्वी प्रशांत साळुंके यांच्याकडून हप्ता घेण्यासाठी काही गुंड आले. गावठी कट्टा डोक्याला लावत झटापट केली यात ते जखमीही झाले. यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी सोन्या खिरकाडेला अटक केली. मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने साळुंखे यांच्यासह अनेक जण खंडणीच्या दहशतीखाली वावरत आहे. पोलिसांनी खंडणीखोरांचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे अशी मागणी होऊ लागलीय.
साळुंखे यांच्याप्रमाणे अनेक व्यावसायिकांच्या बाबतीत अशा घटना घडल्या आहेत. विविध घटनांची पोलिसांकडे नोंद आहे. लवकरच खंडणीखोरांचा बंदोबस्त लावून कठोर कारवाई करू असं आश्वासन पोलीस अधिकारी देत आहेत.
मुळात डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांगरे पाटलांच्या शहरात गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहाता, खंडणीखोरांचा धुमाकूळ पाहता पोलिसांची ही डॅशिंग इमेज वास्तवात कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता नाशिककरांना आहे.