गडचिरोली : दारूबंदी असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीकडे पाहिले जाते. या जिल्ह्यात दारु तस्करी करण्यासाठी तस्कर चक्क राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आणि बोधचिन्हाचा वाहनांवर वापर करत असल्याचे धक्कादायक चित्र उजेडात आलंय.
गडचिरोली पोलिसांनी नुकत्याच पकडलेल्या सव्वा कोटी रुपयंच्या अवैध दारू साठ्याच्या जप्तीप्रसंगी हे वास्तव पुढे आलंय. गडचिरोलीच्या स्थानिक गुन्हे शाखा शोध पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे अहेरी-सिरोंच्या मार्गावर पाळत ठेवली होती.
पहाटेच्या सुमारास पोलिसांना एक टाटा सुमो आणि एक १० चाकी ट्रक येताना दिसला. या गाड्यांची तपासणी केली असता यात अवैध दारूच्या १००० पेट्या आढळून आल्या. विशेष म्हणजे या सुमोवर शिवसेनेचं बोधचिन्ह आणि जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंग चंदेल यांचं पुसटसं नावं असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या प्रकराची गंभीर दखल घेतली असून मूळ मालकाचा शोध घेतला जातोय.