पुणे : भारतात पासपोर्ट मॅन म्हणून प्रसिद्ध झालेले देशाचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमात त्यांनी तसे संकेत दिले आहेत. मुळे नेमके कुठल्या पक्षाकडून आणि कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याची चर्चा आता सुरु झालीय.
ज्ञानेश्वर मुळे सांगतात, मी पुण्याचा नाही, पण पुण्याशी माझी नाळ जुळलीय. कोल्हापूरच्या माणसाला पुण्यात येऊन फड गाजवल्याशिवाय बरे वाटत नाही. ज्ञानेश्वर मुळे पुण्याचा राजकीय फड गाजवण्याचा तयारीत तर नाहीत ना, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय.
मुळे हे लवकरच शासकीय सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यांची निवृत्ती जवळ येऊ लागताच त्यांचा जाहीर कार्यक्रमांतील सहभाग लक्ष वेधून घ्यावा इतका वाढलाय. आणि त्यातच ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जाऊ लागलंय. राजकारणात चांगल्या माणसांनी यायला पाहिजे असं सांगतानाच निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
ज्ञानेश्वर मुळे नेमके कुठल्या पक्षाकडून लढणार हाच काय तो प्रश्न आहे. मोदी लाट ओसरली असल्याचीही चर्चा आहे. अशा परिस्थितीत पक्षाची विजयी घौडदौड कायम ठेवण्यासाठी भाजपकडून काही स्वरूपात धक्कातंत्र अवलंबलं जाण्याची शक्यता आहे. त्यातूनच काही आश्चर्यजनक चेहरे निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात.
ज्ञानेश्वर मुळे हे त्यापैकी एक. ज्ञानेश्वर मुळे यांनी देशात पासपोर्ट क्रांती घडवलीय हे अगदी खरे आहे. देशातील तमाम पासपोर्टधारक तसेच पासपोर्ट इच्छुक नागरिक ही गोष्ट निर्विवादपणे मान्य करतील. आता त्यांच्या या कार्य कर्तृत्वाचा शिक्का त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर उमटणार का याबद्दल उत्सुकता आहे.