योगेश खरे झी मीडिया नाशिक: घरोघरी गणपती बाप्पाचं वाजत-गाजत आगमन झालं आहे. सध्याचा काळ हा कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन आवश्यक आहे. मात्र बाप्पाची आरती करताना सॅनिटायझरचा वापर करू नका...हे आम्ही अशासाठी सांगतोय कारण पूजेच्यावेळी सॅनिटायझरचा वापर जीवघेणा ठरू शकतो.
लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन झालं आहे. पुढचे दहा दिवस म्हणजे गणेशभक्त बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा करतील. मात्र हे सगळं करत असताना एक फार काळजी घेण्याची गरज आहे. पूजा करण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर टाळा, कारण सॅनिटायझर ज्वलनशील असतं. तुम्ही हाताला सॅनिटायझर लावून आरती करत असाल किंवा अगरबत्ती, धूप लावत असाल तर अनर्थ घडू शकतो.
कोरोना संकटामुळे सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. मात्र सॅनिटायझर केव्हा वापरावं आणि केव्हा वापरू नये याचंही भान प्रत्येकानं बाळगायला हवं. सॅनिटायझरचा धोका लक्षात घेऊन प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे.
आरतीपूर्वी आपल्या कुटुंबासाठी किंवा पाहुण्यांसाठी सॅनिटायझर ठेवू नका. त्यापेक्षा साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. लक्षात ठेवा सॅनिटायझर अत्यंत ज्वालाग्राही असतं. त्यामुळे सॅनिटायझर लावून आरतीच्या ज्योतीवर हात ठेवू नका. आधीच कोरोनामुळे सण, उत्सवांवर विरजण पडलंय. त्यात रंगाचा भंग होऊ नये असं वाटत असेल तर पूजा-अर्चा करताना सॅनिटायझरचा वापर टाळलेलाच बरा.