रिल्स बनवण्यासाठी विहिरीवर गेला अन् तोल जाऊन पडला, ३२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर...

Boy Died While Making Reels In Dombivali: रिल्स बनवण्याच्या नादात पडला एक १८ वर्षांचा मुलगा विहरीत पडल्याची घटना घडली आहे. ठाकुर्ली परिसरातील ही घटना आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 14, 2023, 11:31 AM IST
रिल्स बनवण्यासाठी विहिरीवर गेला अन् तोल जाऊन पडला, ३२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर... title=
dombivali news 18 years old boy fall in well while making reels died

Boy Died While Making Reels: तरुण पिढी सोशल मीडियाच्या (Social Media) पूर्णपणे आहारी गेली आहे. सेल्फी काढण्याच्या मोहापायी अनेकांनी जीव गमावले आहेत. तर, सोशल मीडियावर स्टार (Reels Star) होण्यासाठी अनेक तरुण-तरुणी धडपडत असतात.  रिल्स शूट करण्यासाठी धोकादायक स्टंट करणे किंवा पवित्र ठिकाणी आक्षेपार्ह व्हिडिओ काढणे, असे प्रकार हल्ली वाढले आहेत. यातील अनेकांवर पोलिसांनी कारवाईदेखील केली आहे. तरीदेखील रिल्ससाठी धोका पत्करणाऱ्या तरुणांचे डोळे अजून उघडलेले नाहीत. डोंबिवलीतही (Dombivali) अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. रिल्सच्या (Instagram Reels) नादात एका तरुणाने जीव गमावला आहे.

मुंब्र्याचा तरुण रिल्ससाठी डोंबिवलीत गेला  

डोंबिवली जवळील ठाकुर्ली भागातील पंप हाउसच्या खोल विहीरीत पडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. बिलाल सोहिल शेख असे या तरुणाने नाव आहे. बिलालच्या मृत्यूनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

रिल्स बनवताना तोल गेला 

बिलाल हा मित्रांसह शनिवारी सायंकाळी रिल्स बनवण्यासाठी पंप हाऊस येथे गेला होता. रिल्स करताना तोल गेल्याने तो खोल असलेल्या विहरीत पडला. बिलालला विहरीतील पडल्याचे पाहताच त्याचे दोन मित्र रेल्वे सुरक्षा बलाकडे गेले. त्यांनी बिलालसोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने विष्णूनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

३२ तासांनंतर सापडला मृतदेह

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. विहिरीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम ३२ तास सुरू होते. सोमवारी सांयकाळी अग्निशमन दलाच्या जवानांना बिलालचा मृतदेह हाती लागला. दरम्यान बिलाल हा रिल्स बनवत असल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगीतले. तसंच, तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. 

कल्याणमध्ये रिक्षा चालकाने डॉक्टरला लुटले

कल्याणमध्ये रिक्षा चालक आणि त्याच्या तीन मित्रांनी डॉक्टरला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षा चालक आणि त्याच्या तीन मित्रांनी डॉक्टरला गोड बोलून जाळ्यात अडकवले. त्याची ओळख काढल्यानंतर त्याला पार्टीचे आमिष दाखवले. पार्टीच्या नावाने त्याला दारू पाजली. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या  पैसे आणि सोने लुबाडून घेतले. तर, डॉक्टरच्या खात्यातून ७३ हजार रुपये काढले. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच 24 तासाच्या आत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.