डोंबिवलीत सापडला सराईत गुन्हेगार, अपंगत्वाचा फायदा घेत बाईकच्या मागे बसून...'

Dombivli Crime: धक्कादायक म्हणजे बाईकवर मागे बसायचा तो इसम पायाने अपंग आहे. या दोघांनी मिळून आत्तापर्यंत पाच शहरात चैन स्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे.

Updated: Dec 23, 2023, 02:15 PM IST
डोंबिवलीत सापडला सराईत गुन्हेगार, अपंगत्वाचा फायदा घेत बाईकच्या मागे बसून...' title=

Dombivli Crime: डोंबिवली शहरात चैन स्नॅचिंगच्या अनेक घटना समोर येत आहेत. अंधाराचा फायदा घेऊन, मागून बाईकवरुन येत सोने, मोबाईलसारखी मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढले जात आहेत. दरम्यान  मानपाडा पोलिसांनी यावर कडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यात त्यांनी एक अजब चैन स्नॅचर टोळीला पकडले आहे. यातील एकजण बाईक चालवायचा तर दुसरा त्याच्यामागे बसून चैन स्नॅचिंग करायचा. इथपर्यंत तुम्हाला सर्व अनपेक्षित नाही असे वाटेल. पण धक्कादायक म्हणजे बाईकवर मागे बसायचा तो इसम पायाने अपंग आहे. या दोघांनी मिळून आत्तापर्यंत पाच शहरात चैन स्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे.

डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विजय सेल्स दुकानासमोर एक चैन स्नॅचिंगची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. 

पोलिस सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीपर्यत पोहचले. यानंतर रायगड येथील मानगाव परिसरातून दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. सुखविंद सिंग आणि विरु राजपूत अशी या चोरट्यांची नावे आहे. 

धक्कादायक म्हणजे सुखविंदर सिंग हा पायाने अपंग आहे. तो बाईकवर मागे बसतो. विरु हा  दुसरा चोर बाईक चालवितो. संधी मिळताच सुखविंद हा नागरीकांच्या अंगावरील दागिने हिसकवितो. त्यानंतर दोघेही बाईकवरुन पसार होतो, अशी यांची चोरी करण्याची पद्धत होती, अशी माहिती एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली. 

या दोघांनी पाच शहरात धुमाकुळ घातला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी साडे सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एकीकडे समाजाकडून अपंग असलेल्या व्यक्तीविषयी सहानुभूती दाखविली जाते. मात्र त्याच अपंग व्यक्तीकडून अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे केले जात असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे.