Dombivli MIDC Boiler Blast : डोंबिवलीतील MIDC स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू, 48 जण जखमी

 डोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत.  

नम्रता पाटील | Updated: May 23, 2024, 06:05 PM IST
Dombivli MIDC Boiler Blast : डोंबिवलीतील MIDC स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू, 48 जण जखमी title=

Dombivli MIDC Boiler Blast Death : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूला काही किलोमीटरवर असलेल्या इमारती, दुकानांच्या काचा फुटल्या. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. 

3 ते 4 किमीपर्यंत स्फोटाचा आवाज

डोंबिवली परिसरातील एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत दुपारी दीड ते दोनच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यानंतर  काही वेळातच आगीचे व धुराचे लोळ सर्वत्र परसले. यावेळी बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीतील खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच परिसरातील दुकानांच्या काचा फुटल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे डोंबिवलीतील रस्त्या-रस्त्यावर काचांचा खच पडला होता. 

आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

त्यासोबतच या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 ते 4 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. तसेच आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचे व्हिडीओ आणि फोटोही समोर आले. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सुरुवातीला अडथळा येत होता. आगीची तीव्रता भीषण आणि धुराचे लोळ परिसरात पसरत असल्याने त्यांना आग विझवताना मोठी कसरत करावी लागली. डोंबिवलीतील या भीषण स्फोट दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 

48 पेक्षा अधिक कामगार जखमी

तर तब्बल 48 पेक्षा अधिक कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात 40 जणांवर उपचार सुरु आहे. तर नेपच्यून रुग्णालयात 15 जणांवर उपचार सुरु आहेत. मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली MIDC येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अमुदान केमिकल कंपनीत भीषण स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत सुरुवातीला भीषण स्फोट झाला. त्यानंतर ही आग आजूबाजूला असलेल्या कंपन्यांमध्ये पसरत गेली. यात मेहता पेंट, के.जी.एन केमिकल, सप्त वर्ण, हुंडाई शो रूम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यावेळी हुंडाई शो रुममधील 10 ते 12 गाड्याही जळून खाक झाल्या.