BDD Chawl Redevelopment: मुंबईत बीडीडी चाळींचा पुनर्विकास होत आहे. वरळी, नायगाव आणि नाम जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प सरकारने हाती घेतला असून प्रत्यक्षात याचे काम देखील सुरु झाले आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असतात. याच बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात पोलिस मात्र मोठ्या संकटात सापडले आहेत. सरकारच्या एका निर्णयामुळे बीडीडी चाळीतील 200 पोलीस कुटुंब बेघर होवू शकतात. पोलिसांना बीडीडी चाळीत फक्त 15 लाखात घर मिळणार आहे (BDD Chawl Redevelopment).आधी ही किंमत 50 लाख आणि नंतर 25 लाख ठेवण्यात आली होती.
मुंबईच रक्षण करणारे पोलिसही बीडीडी चाळीत राहतात. या चाळींचा विकास करत असताना 2010 पर्यंतच्या पोलिसांना घर देण्यात येणार आहेत. त्यामुळे नंतरच्या पोलिस कर्मचाऱ्यांना बेघर होण्याची वेळ आली आहे. 200 अपात्र कुंटुंबांनी या अधिवेशनात सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे . सरकारने आम्हाला दिड वर्षात तोंडी आश्वासन दिले. या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा याकरता मागणी करतो घरांच्या किमती 4 वेळा बदलल्या परंतु आम्हाला अपात्र करवुन अन्याय केला जातोय असे पोलीस कुटुंब सदस्य सचिन नलावडे म्हणाले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. 1 जानेवारी 2011 पर्यंत बीडीडी चाळींमध्ये जे पोलिस कर्मचारी वास्तव्यास आहेत (सेवेत कार्यरत, सेवानिवृत्त व दिवंगत पोलिस कर्मचाऱ्यांचे कायदेशीर वारस) त्यांना बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाअंतर्गत 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या पुनर्विकसित गाळ्याचे वितरण मालकी तत्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पोलिस कर्मचारी / त्यांचे वारसदार यांच्याकडून त्यांना देण्यात येणाऱ्या कायमस्वरूपी पुनर्विकसित गाळ्याकरिता पंधरा लाख रुपये बांधकाम खर्चाची रक्कम आकारण्याबाबत निर्णय घेण्यात आला. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असून या प्रकल्पाची जबाबदारी शासनाने म्हाडाकडे सोपविली आहे.