महाराष्ट्रातील 963 वर्ष जुन्या प्राचीन शिव मंदिराची झीज थांबवण्याचा प्रयत्न; सलाईनद्वारे केमिकलचा मारा

Ambernath Shiv Mandir : अंबरनाथ रेल्वेस्थानकापासून साधारण 1KM अंतरावर आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरुन रिक्षा पकडून येथे जाता येते. 

Updated: Mar 4, 2024, 08:09 PM IST
महाराष्ट्रातील 963 वर्ष जुन्या प्राचीन शिव मंदिराची झीज थांबवण्याचा प्रयत्न; सलाईनद्वारे केमिकलचा मारा title=

Ambernath Shiv Mandir History :   मुंबईच अगदी जवळ असलेले अंबरनाथ येथील महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शिवमंदिर आहे. 963 वर्ष जुन्या शिव मंदिराची झीज थांबणार आहे.  अखेर पुरातत्व विभागाला जाग आली आहे. या प्राचीन शिव मंदिरावरील शिल्पांचे जतन करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.   केमिकलचा वापर करून झीज थांबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

अंबरनाथ प्राचीन शिव मंदिर हे स्थापत्य कलेचा अनोखा नमुना

अंबरनाथ प्राचीन शिव मंदिर हे स्थापत्य कलेचा अनोखा नमुना म्हणून पाहिला जातो. मात्र गेल्या काही वर्षात या प्राचीन शिव मंदिरावरील शिल्प निखळून पडले असून काही झिजले देखील आहेत.  मात्र आता मंदिरावरील शिल्प निखळून पडत असल्याने पुरातत्व विभागाला जाग आली असून त्यांनी मंदिराची झीज थांबवण्यासाठी काम सुरू केले आहे. 

या शिव मंदिरावरील अनेक शिल्प आणि त्यावरील कोरीव काम हे ठिसूळ झाले असून त्याची झीज थांबवण्यासाठी सलाईनद्वारे केमिकलचा मारा केला जात आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यात शिल्प झिजणार नाहीत आणि ते आणखीन टिकाऊ होतील. मंदिराच्या मागच्या बाजूकडील अधिक हानी झालेल्या शिल्पांची दुरूस्ती सुरू झालं आहे. चार-पाच दिवस ते काम करणार आहेत. त्यानंतर महाशिवरात्री असल्याने काम थांबवले जाईल. पुढे एप्रिल महिन्यापासून शिल्पांच्या डागडुजीचे काम सुरू राहिल, अशी माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाने दिली.

असा आहे मंदिराचा इतिहास

अंबरनाथचे शिवमंदिर हे महाराष्ट्रातील भूमीज शैलीचे सर्वात प्राचीन मंदिर आहे. या मंदिरांची निर्मीती शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात झाली आहे. हे मंदित इ.स. 1060  मध्ये बांधण्यात आल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. अंबरनाथमधील शिवमंदिर हे शिल्पजडीत आहे. मंदिरातील स्तंभांवर अनेक देवी-देवतांचे शिल्प साकारलेले आहेत. या मंदिराच्या शेजारी झुळझुळ वाहणारा पाण्याचा ओढा आहे. हे मंदिर खूप पुरातन काळतील असल्याकारणाने या मंदिरात दररोज अनेक भाविक भेट देतात. हे एक जागृत देवस्थान असल्याचा दावा भाविक करतात. इतर मंदिरांप्रमाणे या मंदिराचा कोणताही ट्र्स्ट स्थापन झालेला नाही. त्यामुळे या मंदिराचा वारसा तेथील मूळ पाटलांच्या नावावर आहे.मंदिराची पूजा आणि देखभाल करण्याच कामही तेच करतात. महाशिवराञी आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते.