Eknath Shinde vs Uddhav Thackeray: निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला (Shinde Faction) दिल्यानंतर ठाकरे गट (Thackeray Faction) आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी जाहीर करत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान दिलं आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा दोन्ही गट एकमेकांना लक्ष्य करत असून टीका करत आहेत. त्यातत आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "निवडणूक आयोगाने कागदावरचे धनुष्यबाण मिंधे गटाला दिले असले तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे. शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुखांनी हे चिन्ह देव्हाऱ्यात ठेवलं आहे".
"शिवसेनाप्रमुखांनी पूजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडे आहे. 100 कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सुप्रीम कोर्टात आम्हीच जिंकू," असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला होता.
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या विधानावर शीतल म्हात्रे यांनी ट्वीट केलं असून मोठा दावा केला आहे. "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिलेला होता," असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी हे लक्षात आहे का? अशी विचारणाही केली.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेची पहिली कार्यकारिणी बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. तसंच या बैठकीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव मांडण्यात आला. याबाबतचा पाठपुरावा केंद्राकडे केला जाईल, असंही या बैठकीत ठरण्यात आलं, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.