त्या चुकीबद्दल महावितरण शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार

महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांसहित आता शेतक-यांनाही बसू लागलाय.

Updated: Oct 14, 2017, 09:59 PM IST
त्या चुकीबद्दल महावितरण शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांसहित आता शेतक-यांनाही बसू लागलाय. लातूर जिल्ह्यात वीज तारा तुटून आग लागली. त्यात शेतक-याचा ऊस जळून खाक झालाय. महावितरणनं आपली चूक मान्य करून नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलंय.

लातूर जिल्ह्यातील शेतक-यांना आता महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसू लागलाय. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दगडवाडीमधील शेतकरी निवृत्ती कोयले या शेतक-याला महावितरणच्या ढिसाळ कारभाराची मोठी किंमत चुकवावी लागतेय.

कर्ज काढून त्यांनी पाच एकरवर कसा-बसा ऊस घेतला. दिवाळीनंतर या ऊसाची तोड होणार होती. मात्र, ऊसाच्या शेतीवरून गेलेल्या महावितरण कंपनीच्या तारा तुटल्या अनं ऊसाच्या शेतात पडल्या. बघता-बघता हा हिरवागार ऊस आगीच्या विळख्यात सापडत जळून खाक झाला.

भर दिवसा ही घटना घडल्यानं तारा तुटून ऊस पेटल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं. महावितरणच्या अधिका-यांना तारातील वीज प्रवाह बंद करण्याची सूचना देण्यात आली होती. दुर्दैवानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करू लागलेत.

महावितरणकडे साहित्याची आणि कर्मचा-यांची कमतरता असल्यामुळेच शेतक-यांचं नुकसान झाल्याचं पंचनामा करणा-या अधिका-यांनी मान्य केलंय. तसंच याची नुकसान भरपाई शेतक-याला मिळेल असं आश्वासनही अधिका-यांनी दिलंय.

महावितरणाचा हलगर्जीपणाच शेतक-याच्या पाच एकरावरील ऊस जळण्यास कारणीभूत असल्याचे स्पष्ट होतंय. त्यामुळे यातील दोषींवर काही कारवाई होणार का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.