आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : शिक्षण अधिकारी तसेच अनेक सरकारी अधिकारी लाच घेत असल्याची प्रकरण मागील आठवडाभराक उघडकीस आली. आता एका PHD डॉक्टरला खंडणी घेताना अटक करण्यात आली आहे. हा डॉक्टर रेती व्यावसायिकांकडे खंडणी मागायचा. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे हा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे (Chandrapur Crime News).
29 वर्षीय शुभम चांभारे असं आहे रेती व्यावसायिकाचे नाव आहे. तर, डॉ. नरेंद्र दाते (PHD) असं आहे आरोपीचं नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात एका वैध वाळूघाट चालकाला सामाजिक कार्यकर्ता असलेल्या पीएचडीप्राप्त डॉक्टरने धमकावत पैशाची मागणी केली. परंतु या मागणीला भीक न घालता त्याने थेट पोलिसात धाव घेत त्याचे बिंग फोडले. 29 वर्षीय शुभम चांभारे मागील 4 ते 5 वर्षांपासून कायद्याच्या चौकटीत राहून आपला व्यवसाय करीत आहेत. परंतु त्याला लुटण्याचा प्रयत्न एका पीएचडप्राप्त डॉक्टरने सुरू केला.
सतत काही ना काही कारणावरून बड्या अधिकाऱ्याची धमकी देत तो वारंवार फोन करत असे. भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांनी चांभारे यांच्या राळेगाव रिठ भद्रावती येथील वाळू घाटावर जात फोटो काढत सुपरवायझर आशुतोष घाटे याला धमकविण्याचे प्रकार सुरू केले होते. मात्र वारंवार होणाऱ्या त्रासामुळे वाळू चालकाने पोलिसांकडे मदत मागितली.
डॉ. दाते हा महिन्याभरापासून चांभारे यांच्या वाळू घाटावर जात त्यांना पैश्यासाठी त्रास देत होता. इतकेच नव्हे तर दाते हा इतरांकडून चांभारे यांना माहिती पाठविण्याचे काम करायचा. अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध असल्याचे सांगून वाळूवरील कारवाई टाळायची असेल तर सर्व अधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी लाख रुपये द्यावे लागतील अशी बतावणी करत होता. चांभारे यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.
मात्र, 9 जूनला पून्हा डॉ. दाते यांनी सुपरवायझर घाटे याला कॉल करीत पैशाची मागणी केली. या सर्व प्रकरणाची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. वरोरा पोलिसांनी कलम 385 अन्वये डॉ. नरेंद्र दाते यांच्यावर गुन्हा दाखल केला. महसूल विभागाची सर्व माहिती लॅपटॉप आणि टॅबलेट द्वारे आपल्या जवळ ठेवणाऱ्या डॉ. दाते यांना पोलिसांचा हिसका मिळताच अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे.