कर्ज आणि दुबार पेरणीच्या संकटाने शेतकऱ्याची आत्महत्या

विदर्भात शेतकऱ्य़ाची आत्महत्या

Updated: Jun 23, 2018, 09:23 PM IST

यवतमाळ : शेतीत दुबार पेरणीची वेळ आल्यानं आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्यानं यवतमाळमध्ये आणखी एका चिंताग्रस्त शेतकऱ्यानं आत्महत्या केली. वणीमधल्या वांजरी इथली ही दुर्दैवी घटना घडली आहे. ४० वर्षीय शंकर बापूराव देऊळकर असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून शंकर देऊळकर यांनी स्वतःला जाळून घेतलं. शंकर देऊळकर यांच्याकडे ४ एकर शेतजमीन होती. जोडीला ते मक्त्यानेही शेती करायचे. यावर्षी मृगाच्या सरी बरसल्या आणि पेरणीला सुरुवात झाली. देऊळकर यांनी सुद्धा सहकारी संस्थेचं पीक कर्ज उचलून कपाशीची लागवड केली. मात्र पावसाने दडी मारल्यानं पेरलेलं बी जमिनीतच करपलं. आता दुबार पेरणी कशी करावी आणि कर्ज कसं फेडावं या प्रश्नाने ते चिंतातूर होते. त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.