प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगड जिल्हयातील खोपोली ते वाकण फाटा या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आलं आहे. त्यासाठी रूंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र लगतच्या शेतक-यांना विश्वासात न घेता परस्पर काम सुरू झाल्याने सुधागड तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. शासन दरबारी दाद मागूनही कुणीच लक्ष देत नसल्याने या शेतक-यांनी आता उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.
मुंबईतून कोकणात जाणारा मुंबई-गोवा महामार्ग अनेकदा वाहतूक कोंडीत अडकतो. अशावेळी खोपोली ते वाकण फाटा हा मार्ग त्याला पर्यायी ठरु शकतो. हीच बाब लक्षात घेवून हा ४२ किलोमीटरचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करुन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला. आता या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू झालंय. मात्र लगतच्या शेतक-यांना कुठल्याही नोटिसा न देता किंवा विश्वासात न घेता हे काम परस्पर सुरू करण्यात आलंय. त्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष आहे.
सुधागड तालुक्यातल्या २२ गावातले शेतकरी यात बाधित होतायत. याशिवाय रोहा आणि खालापूर तालुक्यातल्या १२ गावांचा समावेश आहे. या जमिनींचं १९७४ मध्येच संपादन झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जातोय. मात्र असं असलं तरी अनेक ठिकाणी भूसंपादन झाल्याचे पुरावेच नाहीत. आजही या जमिनी शेतक-यांच्याच नावे असून ते दरवर्षी त्याचा कर भरतायत.
जमिनीची मोजणी न करताच तसंच शेतक-यांचा विरोध डावलून रुंदीकरणाचं काम सुरू आहे. त्यासाठी झाडांची मोठया प्रमाणावर कत्तल करण्यात आलीय. शिवाय कडधान्याच्या पिकांवर बुलडोझर फिरवण्यात आलाय. त्यामुळे आता शेतक-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.
एकीकडे प्रकल्प आला की त्याला विरोध करण्याची सोयीस्कर भूमिका सर्वत्र घेतली जाते. अशावेळी प्रकल्पाला विरोध न करणा-या रायगडमधील या शेतक-यांच्या भावना कुणी समजून घेईल का? हाच खरा सवाल आहे.