चिकनं चिकनं म्हावरं..! मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवण्यात आली आहे.

Updated: Aug 3, 2021, 05:43 PM IST
चिकनं चिकनं म्हावरं..! मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
संग्रहित छायाचित्र

रायगड : 1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवण्यात आली आहे. असं असलं तरीही मच्छीमार बोटी अद्यापही समुद्राच्या किनाऱ्यावरच आहेत. खराब हवामानामुळे वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे खोल समुद्रात बोटी अद्यापही गेलेल्या नाहीत. 

जवळपास दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शासनाने खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवत बोटी समुद्रात मासेमारीसाठी जाण्याची परवानगी दिली. पण, अद्यापही बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत. अलिबाग किनाऱ्यावर असणाऱ्या 300 ते 400 बोटी अद्यापही किनाऱ्यालाच आहेत. त्यामुळं याचे थेट परिणाम मासे खरेदी करणाऱ्यांवर दिसून येत आहेत. 

समुद्र हा पूर्णत: खवळलेला असल्यामुळे पुढचे किमान पंधरा दिवस तरी मासेमारीसाठी अनुकूल वातावरण नसेल अशी प्रतिक्रिया स्थानिक मासेमारांनी दिली. सरगा (पापलेट), मांदेली, कोलंबी, बोंबील हे मासे कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे त्यांचे दर वाढल्याचं दिसून येत आहे. 

बाजारात मासे हवे त्या प्रमाणात येत नसल्य़ामुळे उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडत आहेत. त्यातच श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी मासे खाणाऱ्यांनी बाजाराची वाट धरली आहे. पण, तिथंही त्यांचा हिरमोड होत आहे. सध्याच्या घडीला मासळी बाजारांमध्ये कोळंबी - 350 रुपये किलो, बोंबील - 200 रुपये किलो आणि मांदेली - 150 रुपये किलो इतक्या दरानं विकली जात आहे.