जयेश जगड / अकोला : लॉकडाऊन (Akola Lockdown) लागला आणि सर्व काही थांबलं आणि सर्वात मोठा प्रश्न उभाराहिला तो म्हणजे पोटाचा. पोटाची आग शांत करण्यासाठी लोकांची मोठी पायपीट झाली. त्यामध्ये कोरोना रुग्णांची, दवाखान्या बाहेर त्यांच्या नातेवाईकांची, गरिबांची मोठी गैरसोय झाली. हे सर्व चित्र पाहून अकोल्यातील शिक्षकांनी सुरुवातीला आपल्या शिक्षक सहकाऱ्यांसाठी सुरु केलेली अन्नपेढीने आता व्यापक रुप घेतले आहे.(Teachers Cooperative Food Bank ) अकोला जिल्ह्यातील दापुरा केंद्रातील शिक्षकांची ही अन्नपेढी. (Dapura center food bank )
अकोला जिल्ह्यातील 40 जिल्हा परिषद शिक्षकांच्या एका कामाचं सध्या जिल्हाभरात चांगलंच कौतुक होत आहे. हे सर्व शिक्षक अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दापूरा केंद्रातील शाळांचे शिक्षक आहेत. या शिक्षकांनी एकत्र येत मागच्या तीन महिन्यांपासून कोरोनाग्रस्त रुग्ण, त्यांच्या कुटुंबीयांना ,आणि रस्त्यावरील अनाथांना जेवणाचे डब्बे पुरविण्याचा उपक्रम सुरु केला आहे. सकाळी 4 वाजतापासून हे सर्व शिक्षक एकत्रित येऊन जेवण तयार करतात. विशेष म्हणजे घरकाम , शाळेतील काम सांभाळून हे सर्व शिक्षक अन्न वाटपाचा कार्य करताय. विशेष म्हणजे स्वयंपाक तयार करण्यासाठी पुरुष मंडळीही महिलांना मदत करतात. रोज या चविष्ट जेवणाचा मेनू सुद्धा वेगळा असतो. गरजूंनी एक फोन केल्यावर प्रत्येक रुग्णालयात जाऊन हे शिक्षक त्यांना डबे पोहोचवत आहे.
सुरुवातीला 27 डब्यांची सेवा सुरु करणारे हे शिक्षक सध्या दररोज 200 डब्बे विविध कोरोनाग्रस्त कुटुंबीयांना पुरवत आहेत. प्रत्येक शिक्षकावर एका विभागातील डब्बे पोहोचविण्याची जबाबदारी आहे. या संपूर्ण जेवणासाठी होणारा खर्च हे सर्व शिक्षक वर्गणी करुन करतात. आता या उपक्रमासाठी समाजाकडूनही देणग्या यायला सुरुवात झाली आहे.
या उपक्रमाची सुरुवात तीन महिन्याधी झाली जेव्हा काही शिक्षक आणि कुटुबीय कोरोनाग्रस्त झाले. त्यांच्या घरच्या जेष्ठ मंडळी आणि लहान मुलांचे जेवणाचे वांदे झाले होते. यातूनच या अनोख्या अन्नछत्राच्या संकल्पनेचा जन्म झाला. आधी फक्त शिक्षकांच्या कुटुंबीयांपर्यंतच सिमीत असलेला हा उपक्रम आता सर्वांच्या मदतीसाठी धाऊन जात आहे.
सध्या हॉटेल, मेस, रेस्टॉरंट बंद आहे. त्यामुळे बाहेरगावीहून आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोठे हाल होत आहे..वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिरहून आलेल्या गीतेश चौव्हानने या शिक्षकांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांना संपर्क केला आणि एका फोन वर आता त्यांना दररोज स्वादिष्ट जेवण मिळत आहे. देश घडविण्याची मोठी जवाबदारी शिक्षकांवर आहे. ज्ञान वितरण सोबतच या शिक्षाकांनी सुरू केलेली अन्न वितरण सेवा निश्चितच भावी पिढीला प्रेरणा देणारी ठरेल.