परतीला निघालेल्या हजारो वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था

कथले युवक आघाडीच्या वतीने वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

Updated: Jul 13, 2019, 04:13 PM IST
परतीला निघालेल्या हजारो वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : पंढरपुरहून विठ्ठलाची वारी करून लाखो भाविक उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या तालुक्यातून जात असतात. वारीला जात असताना या वारकऱ्यांची जागोजागी सोय केली जाते, मात्र परतीला निघालेल्या वारकऱ्यांची गाडीपासून जेवणापर्यंत गैरसोय होत असते. ही गैरसोय लक्षात घेता कळंब तालुक्यातील स्व. गणपतराव कथले युवक आघाडीच्या वतीने कळंब बस स्थानकावर वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

गणपतराव कथले युवक आघाडीकडून सकाळी सहा वाजल्यापासून परतीच्या वारकऱ्यांना जेवण दिले जात आहे. सकाळपासून हजारो वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था या आघाडीने केली असून एक लाख वारकऱ्यांना भोजन देण्याचा आपला मानस असल्याचे युवक आघाडीच्या प्रमुखांनी सांगितले. या आघाडीसोबतच नायब तहसीलदार रविराज जाधव, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजित पिंगळे, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, वंचित बहुजन आघाडीचे अनिल हजारे, सागर बाराते यांनीही वारकऱ्यांची सेवा केली.

विदर्भाकडून येणाऱ्या शेकडो दिंड्या या कळंब तालुक्यातून जात असतात. परतीला जात असताना विदर्भाकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास हा १० ते १५ तासांचा असल्याने या आघाडीने त्यांची जेवणाची गैरसोय होऊ नये, म्हणून भोजनाची व्यवस्था केली आहे. वारकऱ्यांनी त्यांची भोजनाची व्यवस्था केल्याने युवक आघाडीचे आभार मानले.