रेशनवर ज्वारीच्या ऐवजी मक्याची जबरदस्ती? संतापजनक कारभार

सरकारचा तुघलकी कारभार...

Updated: Mar 3, 2021, 09:37 PM IST
रेशनवर ज्वारीच्या ऐवजी मक्याची जबरदस्ती? संतापजनक कारभार

योगेश खरे, नाशिक : ज्वारी, बाजरीची भाकरी ग्रामीण भागातल्या घरांमध्ये सर्रास केली जाते. पण आता तुम्ही ज्वारी-बाजरीची भाकरी खाऊ नका, तर मक्याचीच खा, अशी जबरदस्ती सरकार करतं आहे. महाराष्ट्रातला मराठी गडी ज्वारी, बाजरीची भाकरी खातो आणि जगतो. ग्रामीण भागात फार तर कधी कधी चपात्या. आता मात्र सरकारनं तुघलकी कारभार सुरू केला आहे. रेशन दुकानांवर गहू तांदळाऐवजी मका घेण्याची जबरदस्ती केली जातेय. आणि याला कारण ठरलाय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचा संतापजनक कारभार. भरड धान्य योजनेत राज्याने मका खरेदी केलेला असल्याने तो संपवण्यासाठी गहू आणि तांदूळाऐवजी मका दिला जातो आहे. 

शहरातल्या नागरिकांना रेशनवर मका दिला जात नाहीय. ग्रामीण भागातल्य़ा गरजू आणि दारिद्र्य रेषेखालच्या ग्रामस्थांच्या पदरी दिला जातो आहे. याचा फटका रेशन दुकानदारांना बसतोय. नागरिक मका खरेदी करायला तयार नसल्यानं दुकानदारांची कोंडी झाली आहे.

मका हा पाळीव प्राण्यांना अन्न म्हणून दिला जातो. पोल्ट्रीत कोंबड्याना खाऊ घातला जातो. मक्यामध्ये माणसांसाठी फार पोषक द्रव्य नसतात. मका दळायला जड असल्यानं पीठ करायला जास्त खर्च येतो. 

असं असताना रेशनवर मका देण्याचा हट्ट कशासाठी आणि मुळात मक्याची खरेदी करायचीच कशासाठी.... गरिबांनी ही थट्टा का सहन करायची.... अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री या सगळ्याची उत्तरं देणार का...?

Video : बातमीचा व्हिडिओ