सच्ची दोस्ती निभवणारे पक्के राजकारणी; राजकारणाच्या वणव्यात मैत्रीचा गारवा!

Friendship Day 2024 : फ्रेंडशीप डे... अर्थात मैत्री दिवस... राजकारणात कुणीच कुणाचा कायम मित्र आणि शत्रू नसतो, असं म्हणतात... अर्थात यालाही अपवाद आहेत... राजकारणात असूनही कायम मैत्री जपणा-या नेत्यांवर हा खास रिपोर्ट...

वनिता कांबळे | Updated: Aug 4, 2024, 09:36 PM IST
सच्ची दोस्ती निभवणारे पक्के राजकारणी; राजकारणाच्या वणव्यात मैत्रीचा गारवा!   title=

Maharashtra Political Friendship :  चित्रपटातलं चित्र, नाटकातलं पात्र आणि राजकारणातले मित्र... कधीच खरे नसतात, असं म्हणतात... मात्र राजकारणाच्या वणव्यातही मैत्रीचा गारवा जपणारे अनेक राजकीय नेते आहेत... 

राजकारणातले जय आणि वीरू 

सर्वात पहिला नंबर लागतो ते राजकारणातले जय आणि वीरू म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह... या दोघा गुजराती राजकारण्यांचा डंका गेल्या दशकभरापासून भारतात गाजतोय... 1980 पासून ते एकमेकांचे मित्र आहेत. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्रीही नव्हते, तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीत दोघं एकमेकांना पहिल्यांदा भेटले.. तेव्हा मोदी संघाचे प्रचारक होते, तर अमित शाह स्वयंसेवक... 2002 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी अमित शाहांना मंत्री बनवलं. तेव्हापासून आजतागायत दोघांची दोस्ती कायम टिकून आहे... अनेक प्रकरणांमध्ये दोघांवर आरोप झाले, अडचणीत आले, मात्र दोस्तीचा धागा कधीच तुटला नाही... आता केंद्रात मोदी सरकारच्या तिस-या टर्ममध्येही भाजपचे खरे चाणक्य अशीच अमित शाहांची ओळख आहे...

देशात नरेंद्र तसं महाराष्ट्रात देवेंद्र

देशात नरेंद्र तसं महाराष्ट्रात देवेंद्र... देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातला उजवा हात म्हणजे गिरीश महाजन... संकटमोचक अशी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणातली ओळख... फडणवीस नागपूरचे, तर महाजन जळगावचे... मात्र तरीही दोघांमध्ये मैत्रीचं नातं जुळून आलं... दोन वर्षांपूर्वी महायुती सरकारची स्थापना असो किंवा राज्यसभा निवडणुकीतली मतांची फोडाफोडी, फडणवीस राजकीय डावपेचांची आखणी करतात, तेव्हा त्याच्या अमलबजावणीची जबाबदारी अर्थातच महाजनांवर असते...
भाजपात फडणवीस-महाजन जसे मित्र आहेत, 

अजित पवार आणि धनंजय मुंडे

राष्ट्रवादीत अजित पवार आणि धनंजय मुंडे... भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत घडलेले त्यांचे पुतणे धनंजय मुंडे... मात्र काकांचा पक्ष सोडून धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आले तेव्हा शरद पवारांचे पुतणे अर्थात अजित पवारांशी त्यांची यारी दोस्ती जमली... गोपीनाथ मुंडे हे राजकीय गुरू असले तरी राजकारणातल्या कठीण काळात मला आधार दिला तो अजितदादांनी, असं ते जाहीरपणं सांगतात. मध्यंतरी धनंजय मुंडेंवर एका महिलेनं गंभीर आरोप केले, राजकारणातून एक्झिट घेण्याची वेळ त्यांच्यावर आली, तेव्हा अजित पवारांनी त्यांची भक्कम पाठराखण केली. आणि अर्थातच अजित पवार कोणतीही राजकीय खेळी करतात, तेव्हा धनंजय मुंडे यांची मोलाची साथ असते. अजित पवारांनी फडणवीसांसोबत पहाटेची शपथ घेतली, तेव्हा सगळे डावपेच धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरच आखण्यात आले होते.

हे देखील वाचा - महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथ एकदा पाऊस सुरु झाला की सात आठ दिवस थांबतच नाही; कोकणातील स्वर्ग

 

केवळ सत्ताधारी नेत्यांमध्येच नाही, तर मैत्रीचं हे शिवबंधन विरोधी पक्षातल्या नेत्यांमध्येही अगदी घट्ट बांधलं गेलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे त्याचं उदाहरण... संजय राऊत हे शिवसेनेचे चार टर्म खासदार आणि सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक... बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा खांद्यावर घेतली... पूर्वी बाळासाहेब ठाकरे सामनाचे संस्थापक संपादक होते, तर आता उद्धव ठाकरे संपादक आहेत. मात्र शिवसेना संघटना आणि मुखपत्रातलं संजय राऊतांचं स्थान कायम आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा आहे, असं राजकीय निरीक्षक मानतात. सकाळी वाजणारा भोंगा अशी राऊतांची हेटाळणी केली जात असली तरी सध्या ठाकरेंची मुलूखमैदान तोफ कुणी असेल, तर ते संजय राऊतच... ठाकरेंना कुणी अंगावर घेतलं, तर आधी राऊत त्या व्यक्तीला शिंगावर घेतात...

हे देखील वाचा - पृथ्वीवरचं सर्वात मोठं ओझ! यामुळेच जीवसृष्टीचा विनाश होणार 

 

राजकारणात जसे मित्र आहेत, तशाच मैत्रिणीही... राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि द्रमुक खासदार कनिमोळी यांची मैत्रीही अशीच राजकारणापलीकडची आहे... सुप्रिया सुळे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या.. तर कनिमोळी या तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या कन्या... या दोघींमधला मैत्रीचा हा समान दुवा... लोकसभेत एकमेकींच्या सख्ख्या शेजारी असलेल्या या दोघीजणी... अगदी लोकसभेत बसून ही साडी तू कुठून घेतली? अमुक एक साडी कुठं मिळते? अशा टिपिकल गप्पा मारणा-या या दोघीजणी... महिला आरक्षण विधेयकावर सत्ताधारी खासदार कनिमोळींना बोलू देत नव्हते, तेव्हा सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या... त्यांनी सत्ताधारी खासदारांनाच खडसावलं.. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात कणिमोळींची निर्दोष मुक्तता झाली, तेव्हा सर्वात जास्त आनंद झाला तो त्यांच्या मैत्रिणीला... सुप्रिया सुळेंना... राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायम मित्र आणि शत्रू नसतो, असं म्हणतात... मात्र मैत्रीचं नातं जीवापाड जपणारे हे काही राजकारणातले सन्माननीय अपवाद... 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x