अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : या महिन्याच्या सुरवातीला फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने नागपुरातील काही प्रतिष्ठित हॉटेल्समध्ये आयोजित झालेल्या पार्ट्यांमध्ये खुलेआम ड्रगचे सेवन झाल्याची खळबळजनक माहिती आहे.
या रॅकेटमध्ये अद्याप १२ जणांना अटक झाली असून आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर शहरातील आणि नागपूरच्या वेशीवर असलेली काही नामवंत हॉटेल्स आता नागपूर पोलिसांच्या निशाण्यावर आली आहेत.
या महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजेच ६ ऑगस्टला फ्रेंडशिप डे निमित्त सर्वत्र उत्साह होता. नागपुरातील हॉटेल्स आणि काही महत्वाच्या आणि सार्वजनिक ठिकाणांवर तर तरुणाईने जोरदार जल्लोष केला. पण एकीकडे हा जल्लोष होत असतानाच दुसरीकडे मात्र शहरतील काही हॉटेल्समध्ये उघडपणे मादक पदार्थांची तस्करी सुरु होती.
कोकेन नावाच्या या मादक पदार्थाची तर अश्या प्रकारे पाकिटांमधून सर्रास विक्री सुरु होती. आंतरराष्ट्रीय बाजारात साधारणपणे ३,००० ते ५,००० रुपये प्रति ग्राम दराने विकल्या जाणाऱ्या या मादक पदार्थाची किंमत तर सोन्यापेक्षाही जास्त आहे. शहराच्या सिव्हिल लाईन्स भागात कोकेनची तस्करी करणाऱ्या ४ तरुणांना पोलिसांनी अटक केली. मादक पदार्थाचे सेवन कसे व्हायचे याचा प्रत्यक्ष व्हीडीओच आरोपींच्या मोबाईलमध्ये पोलिसांना मिळालाय.
फ्रेंडशिप डेशिवाय १२ ऑगस्टला झालेल्या अश्याच एका पार्टीमध्ये देखील मादक पदार्थांची खरेदी-विक्री झाली होती. अटक झालेल्या तरुणांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मादक पदार्थांच्या तस्करीत शहरातील अनेक धन-दांडगे किंवा त्यांची मुले सहभागी असून या टोळीची लिंक थेट नायजेरियाशी आहे.
मादक पदार्थांच्या तस्करीत नायजेरियाचे नागरिक सहभागी असल्याचं आढळल्याने त्यांच्यामार्फ़त मुंबईहुन कोकेनची तस्करी होत असल्याचं शहराच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. अटक झालेल्यात तरुण, वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी, व्यावसायिकांचा समावेश आहे.
अटक झालेल्यांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे शहरातील आणि नागपूरच्या वेशीवर काही मोठ्या आणि प्रतिष्ठित हॉटेल्समध्ये पदार्थाची खरेदी-विक्री उघडणे होत असून हे सर्व हॉटेल्स आता पोलिसांच्या निशाण्यावर आहेत.
मोबाईल फोनच्या माध्यमाने खरेदी करता उत्सुक असलेल्यांशी संपर्क होत कोड वर्डच्या माध्यमाने या मादक पदार्थांची विक्री होते. या प्रकरणात तपस सुरु असून येत्या काळात आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे.