43 लाखांचे बक्षित जाहीर झालेले पाच जहाल नक्षलवादी पोलीस चकमकीत ठार

गडचिरोली  (Gadchiroli) जिल्ह्यात पुन्हा नक्षलींनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.  

Updated: Mar 31, 2021, 08:04 AM IST
 43 लाखांचे बक्षित जाहीर झालेले पाच जहाल नक्षलवादी पोलीस चकमकीत ठार title=

मुंबई : गडचिरोली  (Gadchiroli) जिल्ह्यात पुन्हा नक्षलींनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याचदरम्यान, काल पोलीस आणि नक्षली यांच्यात जोरदार चकमक (police encounter) झाली. यावेळी पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ( Five extremism Naxalites ) पोलीस दलातील सी-६० जवानांचे विशेष अभिनंदन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा  हद्दीत गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला.  यावेळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ जहाल नेत्यासह पाच नक्षलवादी ठार झाले.  (Gadchiroli : Five extremism Naxalites killed in police encounter)

गडचिरोलीतील मालेवाडा या भागात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले आहेत. त्यांच्यांकडून घातपाताची शक्यता होती. टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या आधारे गडचिरोली  पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. त्यांचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी हे नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.

नक्षलवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा खोब्रामेंढा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 च्या जवानांनी नक्षलविरोधी कारवाई सुरु केली. त्यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या 40 ते 50 नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढविला. सी-60 जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. 

सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले असताना घटनास्थळी 3 पुरुष नक्षलवादी आणि 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आलेत. या ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.43 लाख रुपयांचे बक्षीस ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर लावण्यात आले होते. पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत सदर घटनास्थळी एक एके-47 रायफल, एक 12 बोअर रायफल, एक 303 रायफल, एक 8 एमएम रायफल तसेच मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य सापडले. 

ठार झालेले जहाल नक्षलवादी

1) रुषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी (46), याच्यावर 155 गुन्हे दाखल असून 41 खुनाचे गुन्हे होते. राज्य शासनाने त्याचेवर एकूण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

2) राजू ऊर्फ सुखदेव बुधेसींग नैताम (32) याच्यावर  एकूण- 14 गुन्हे दाखल असून यात खुनाचे- 05 गुन्हे होते. शासनाने त्याच्यासाठी एकूण 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

3) अमर मुया कुंजाम (30) याच्यावर एकूण- 11 गुन्हे दाखल असून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.  शासनाने त्याच्यावर एकूण 2 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

4) सुजाता ऊर्फ कमला ऊर्फ पुनीता गावडे ऊर्फ आनाम (38 ) हिच्यावर एकूण- 31 गुन्हे दाखल असून यात खूनाचे- 11 गुन्हे आहेत. शासनाने एकूण 4 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

5) अस्मिता ऊर्फ सुखलु पदा (28)  एकूण-11 गुन्हे दाखल असून यात खूनाचा 1 गुन्हा आणि चकमकीचे 5 सह गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिच्यावर एकूण 2 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x