ब्लॅक कॅट कमांडो, शेकडो पोलीस; डॉन अबू सालेमला रातोरात नाशिकरोड कारागृहाबाहेर काढलं अन्..., गूढ कायम

Gangster Abu Salem: डॉन अबू सालेमला मध्यरात्रीच नाशिकरोड कारागृहाबाहेर काढण्यात आले होते. शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात हा थरार रंगला होता. 

योगेश खरे | Updated: Aug 1, 2024, 10:37 AM IST
ब्लॅक कॅट कमांडो, शेकडो पोलीस; डॉन अबू सालेमला रातोरात नाशिकरोड कारागृहाबाहेर काढलं अन्..., गूढ कायम title=
Gangster Abu Salem moved out of nashik prison for transfer in indias one of the metro city

Gangster Abu Salem: डॉन अबू सालेमला मध्यरात्री नाशिकरोड कारागृहाबाहेर काढण्यात आले आहे. नाशिकमध्ये मध्यरात्री वेगळाच थरार पाहायला मिळाला आहे. अबू सालेमला नाशिक कारागृहातून बुधवारी मध्यरात्री जेलमधून बाहेर काढण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच, ब्लॅक कॅट कमांडोदेखील सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आले होते. नाशिकच्या रेल्वेस्टेशनसह जेलरोड परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. 

अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी आहे. नाशिकरोड कारागृहातील अंडासेलमध्ये अबू सालेमचा महिनाभरापासून मुक्काम होता. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमचा नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले होते. उद्या अबू सालेमला महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात हजर केले जाणार आहे.

अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात भारतातील एक मोठ्या शहरात हलवण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव हे शहर कोणते आहे याचा मात्र खुलासा अद्याप करण्यात आला नाहीये. अबू सालेमला त्याची हत्या केली जाईल अशी भीती होती, त्यामुळं त्याला दुसऱ्या शहरात हलवण्यात आले आहे. ज्या रेल्वेतून अबू सालेम याला नेण्यात आले होते. त्या रेल्वेच्या विशेष बोगीची श्वान पथकाकडून तपासणीदेखील करण्यात आली होती. मात्र, अबू सालेमला आता कोणत्या कारागृहात ठेवणार हे गूढ कायम आहे. 

तसंच, डॉन अबू सालेमच्या निर्विघ्न प्रवासासाठी ब्लॅक कॅट कमांडो, जेल पोलीस, महाराष्ट्र पोलीस, आरपीएफचे शेकडो जवान तैनात करण्यात आले होते. डॉन अबू सालेमसह पोलिसांच्या नाशिक रेल्वेस्टेशनवरील एन्ट्रीने रेल्वे प्रवाशीही हादरले होते. 

पूर्ण शहराला छावणीचे स्वरुप आले होते. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. अबू सालेमला मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या समुरास कारागृहातून बाहेर काढले. रेल्वे स्थानकात अबू सालेमला सुरक्षित ठेवणे पोलिसांसमोर मोठं आव्हान होते. जवळपास अर्धा तास अबू सालेम रेल्वे स्थानकात उभा होता. 

अबू सालेमला भारतातील एका मोठ्या शहरात  नेण्यात आले आहे. त्यानंतर तेथीलच न्यायालयात त्याला सुनावणी व न्यायालयीन प्रक्रियेसाठी हजर करण्यात येणार आहे. गोपनीय कारवाई होती. तसंच, नेमकी कोणत्या प्रकरणात सुनावणी होणार आहे, हे देखील अद्याप समोर आलेले नाहीये. सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेन याच्याविषयीची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.