आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याण मतदारसंघाच्या राजकारणातील 2 फेब्रुवारी 2024 हा दिवस कोणीच विसरु शकणार नाही. भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी भर पोलीस स्थानकातच कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. या घटनेने एकच खेळबळ उडाली. गोळीबाराचे (Firing) सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं सांगतिलं जातं. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 26 फेब्रुवारीला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
डिस्चार्ज दिल्यानंतर महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महेश गायकावज यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती दिली. कल्याण पूर्व इथल्या विविध समस्यांचा पाठपुरावा मी करत होतो. प्रत्येक वेळेला आमदार गणपत गायकवाड अडचणी निर्माण करत होते, सामाजिक कामात नव्हे तर माझ्या व्यवसायात देखील त्यांनी माझ्या भागीदारांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या . याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री कपिल पाटील ,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळा प्रकार सांगितला.
प्रत्येक वेळी त्यांनी माझी समजूत काढली , युतीत आहे असं सांगण्यात आलं. शेतकऱ्यांवर अन्याय झाला याचा मी विरोध केला. याचा राग गणपत गायकवाडला होता. 2 फेब्रुवारीला पोलीस स्थानाकात अचानक त्याने आपल्यावर गोळीबार केला असं महेश गायकवाड यांनी सांगितलं. गणपत गायकवाड 2019 मध्ये संधी साधून भाजपमध्ये आले ते भाजपचे कार्यकर्ता नाहीत. भाजपचे हे संस्कार नाही ,माझा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे असंही महेश गायकवाड म्हणाले.
आमदार गणपत गायकवाड यांना कठोर शिक्षा मिळेल. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या आईचे ,गोरगरिबांचे आशीर्वाद आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे आज मी तुमच्यासमोर उभा आहे, इथून पुढे आणखी जोमाने समाजसेवा करेन असंही महेश गायकवाड यांनी सांगितलं.
महेश गायकवाड यांच्या पत्नीची मागणी
गणपत गायकवाड यांच्यावरत कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी महेश गायकवाड यांच्या पत्नीने केलाय. महेश गायकवाड यांच्या पत्नी देखील डिस्चार्जच्या वेळेस उपस्थित होत्या.
कोण आहे गणपत गायकवाड?
गणपत गायकवाड हे भाजपचे कल्याण पूर्वण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत ते भाजपाच्या चिन्हावर निवडून आले. त्याआधी गेली 15 वर्षांपासून ते अपक्ष आमदार होते. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही पाठिंबा दिला होता. कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांचा टीव्ही केबलचा मोठा व्यवसाय आहे.