Maharashtra News Today: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात ही विनंती करण्यात आली होती.
शरद पवार यांच्या पक्षाकडून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका तातडीने सुनावणी होण्यासाठी सूचिबद्ध करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. त्यानुसार, ही याचिका 25 सप्टेंबरला सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. 25 सप्टेंबर रोजी प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसंच, कोर्ट नक्की सुनावणी कधी घेणार हे आज येणाऱ्या कोर्टाच्या लिस्टमधून स्पष्ट होणार आहे. यापूर्वी देखील २ वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेंशन करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नव्हती.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांना नवीन निवडणूक चिन्हे देण्यात यावीत, अशी मागणी शरद पवार पक्षाकडून करण्यात आली आहे. वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
लोकसभेपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं होतं. तसंच, पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वापरण्यास परवानगी दिली होती. तर, अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ हे चिन्ह देण्यात आले होते. तसंच, अजित पवार यांच्या पक्षाने शरद पवार यांचे नाव आणि छायचित्र वापरू नये, असा आदेशदेखील दिला होता.